कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत काम करणाऱ्या आशा सेविकांनी आज महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. ठाणे पालघर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन यांच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आशा सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. ऑनलाईन काम करण्यास आशा सेविकांनी नकार दिला आहे. यासह विविध मागण्याकरीता हा मोर्चा काढण्यात आला.
ठाणे पालघर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनचे निमंत्रक सुनिल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात सचिव गीता माने, अध्यक्ष संगीत प्रजापती यांच्यासह १२७ आशा सेविका सहभागी झाल्या होत्या. महापालिका हद्दीत आशा सेविकांची संख्या १६० आहे. या आशा सेविकांनी कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केली होती. आत्ता आशा सेविकांना दर महिन्याला साडे पाच हजार रुपये मानधन दिले जाते. या साडे पाच हजार रुपयांमध्ये त्या घर खर्च भागविणार की स्मार्ट फोन घेणार असा प्रश्न आहे. कारण त्यांना ऑनलाईन काम करण्याची सक्ती केली जात आहे.ऑनलाईनची सक्ती करण्यात येऊ नये. आशा सेविकांना किमान वेतन देण्यात यावे. कामाच्या वेळा आणि प्रकार ठरवून दिला पाहिजे. तसेच दिवाळी सण तोंडावर आहे. आशा सेविकांना किमान पाच हजार रुपयांचा बोनस द्यावा. सरकारी सुट्टीच्या दिवशी लाभार्थींच्या माहिती मागू नये. डेंग्यू, क्षयरोग आणि कुष्ठरोग कामाचे रोजचे दोनशे रुपये देण्यात यावे. गटप्रवर्तकांना सुपरवायझरचा दर्जा दिला जावा. सीएचआे नसलेल्या सर्व सेंटरमधील आशांना आरोग्य वर्धिनीचा निधी मेकिडल ऑफिसरच्या सहीने दिला जावा. या विविध मागण्या यावेळी मोर्चाच्या दरम्यान आशा सेविकांनी केल्या.