कल्याण : ३७०० रुपयात घर कसे चालवायचे असा सवाल उपस्थित करीत कल्याणमधील आशा सेविकांनी केंद्रीय मंत्र्यांना साकडे घातले आहे. आशा सेविकांनी केद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर यांना पगारवाढीसाठी निवेदन दिले.
यावेळी केंद्रीय मंत्री ठाकूर यांच्यासमवेत आमदार संजय केळकर, गणपत गायकवाड, कुमार आयलानी, भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे, माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड आदि पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे सध्या कल्याणच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असून आज कल्याणमध्ये दिवसभरात पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, मतदार, व्यापारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यानंतर त्यांनी कल्याण पूर्वेतील नेतिवली आजदे पिसवली आरोग्य केंद्रांला भेट देत पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी तेथील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका यांच्याकडून आरोग्य विषयी माहिती घेतली. आरोग्यविषयी जनजागृती करणाऱ्या आशा सेविकांनी केंद्रीय मंत्री ठाकूर यांना निवेदन देत आम्ही ३७०० रुपयात घर कसे चालवायचे असा प्रश्न उपस्थित केला.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात १६० आशा सेविका गेली बारा वर्षे कार्यरत आहेत. परंतु त्यांना कामाचा मोबदला फार कमी प्रमाणात मिळतो. आताच्या महागाई नुसार ३७०० पगारा मध्ये कोणी सुद्धा काम करत नाही परंतु आम्ही आमच्या कामाला नेहमी समाज सेवा म्हणून बघत आलो. कोविड सारख्या महामारीमध्ये आम्ही आमच्या कुटुंबाची व स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोणतीही वेळ न बघता आम्ही कोविड पेशन्टला सेवा दिली. त्यामुळे आमच्या कामाचा मोबदला आम्हाला योग्य प्रमाणात दयावा अशा मागणी केली.