कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना काळात जीवाची पर्वा न करता कोराना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून आरोग्य सेवा देणाऱ्या आशा वर्कर्सच्या पदरी निराशाच पडली आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांनी केलेल्या विविध मागण्यांना राज्य सरकारसह महापालिका प्रशासनाने पाने फुसली आहे. या मागण्याकडे सरकारसह महापालिकेचे लक्ष वेधण्याकरीता आज आशा वर्कर्सने भारतीय ट्रेड युनियन केंद्राच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर निदर्शने केली.
भारतीय ट्रेड युनियन केंद्राचे राज्य सचिव सुनिल चव्हाण आणि कविता वरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या निदर्शने आंदोलनात महापालिका हद्दीतील १७५ आशा वर्कर्स सहभागी झाल्या होत्या. राज्य सचिव चव्हाण यांनी सांगितले की, राज्यभरात ७० हजार आशा वर्कर्स आहेत. विविध मागण्यासाठी या आशा वर्कर्सनी १५ जूनपासून संप पुकारला आहे.आशा वर्कर्स या कोरोना काळात अत्यंत कमी वेतनावर आरोग्य सेवेचे काम करीत आहेत.
गेल्या वर्षभरापासून राज्य सरकारकडे आशा वर्कर्सनी विविध मागण्या केल्या आहे. त्यामध्ये कोरोना काळात सेवा देणाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याला ५० लाखाचे कोरोना आरोग्य विमा कवच दिले जाते. ते आशा वर्कर्सना लागू करण्यात यावे. आशा वर्कर्सना किमान वेतन दिले जावे. कोरोना काळात सेवा देताना त्यांना कोरोनाची बाधा झाल्यास त्यांच्यावर मोफत औषध उपचार केले जावेत. कोरोना काळात त्यांना जोखीम भत्ता दिला जावा. तसेच कोरोनाची लस मोफत दिली जावी.
कोरोना काळात आशा वर्कर्सनी चांगले काम केले असल्याचे राज्य सरकारने हे वेळोवेळी मान्य केले आहे. मग आशा वर्कर्सच्या मागण्यांना वर्षभरापासून केराची टोपली का दाखविली जात आहे, असा सवाल कविता वरे यांनी उपस्थित केला आहे.