डोंबिवली: सर्वच भक्तांना विशेषतः सर्व प्रकारच्या कलावंतांना विघ्नहर्ता श्री गणेश हा प्रिय आहे. अत्यंत आनंदी व भक्तिमय वातावरणात सर्वजण या गणेशाची आराधना उपासना करतात कारण श्री गणेश हा चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती मानला जातो. त्यामुळे कल्याणच्या के. सी. गांधी शाळेचे चित्रकला शिक्षक अमोल पाटील यांनी आठ सुपाऱ्यांवरती भगव्या केशरी ऍक्रेलिक रंगाद्वारे अष्टविनायकाचे आठ रूपे अतिशय नाजूक व कौशल्यपूर्ण पद्धतीने चित्रित केली. त्या कलेची ख्याती सर्वत्र चर्चेत आहे.
या वेगळ्या चित्रकृतीबाबत पाटील सांगतात की, त्यांनी चौदा विद्या, चौसष्ट कलांच्या अधिपतीला आगळ्यावेगळ्या कलात्मक पद्धतीने मनोभावे नमन केले. अष्टविनायकांचे चित्रण आकर्षक व मनमोहक असल्याचे चित्रकला प्रेमी सांगतात. त्या सर्व अष्टविनायकाच्या प्रतिमा रंगवण्यासाठी पाटील यांना तब्बल तीन तास वेळ लागला शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा अशा उपक्रमात सहभागी करून त्यांच्याकडून सुद्धा अशा नावीन्यपूर्ण कला निर्मिती करून घेऊ कारण अशाच उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांची सृजनशीलता, कलात्मक दृष्टी, कला कौशल्य व एकात्मता हे गुण वाढीस लागतात असे सुद्धा अमोल पाटील यांनी सांगितले.