कल्याण- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा सहाय्यक सुरक्षा अधिकारी भरत बुळे याला खाजगी सुरक्षा रक्षकाकडून एक हजार रुपये घेताना ठाणे लासलुजपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.
महानगरपालिकेकडून खाजगी सुरक्षा रक्षकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. कल्याण पूर्वेकडील होम बाबा टेकडी येथे कार्यरत असलेल्या एका खाजगी सुरक्षारक्षकाकडून भरत बुळे याने महिन्याला दोन हजार रुपयाची मागणी केली होती. पैशांसाठी बुळे हा तक्रारदाराकडे वारंवार तगादा लावत होता. त्यामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने याबाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीनुसार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सापळा रचला. भरत बुळे याला २ हजार पैकी एक हजार रुपयाची रक्कम घेताना रंगेहात अटक करण्यात आली. अन्य सुरक्षा रक्षकांकडूनही बुळे हा पैसाची मागणी करीत असल्याचे काही सुरक्षा रक्षकांनी सांगितले. सुरक्षा विभागातही भ्रष्टाचार होत असल्याची बाब उघड झाली आहे . भ्रष्टाचाराचा शिक्का पुसून काढण्याचा आव्हान महापालिका आयुक्त समोर आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थापनेपासून आतापर्यंत एकूण ३८ महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका भ्रष्टाचाराने बदनाम आहे. या आधी लिपिक, प्रभाग क्षेत्र अधिकारी, ,कार्यकारी अभियंता ,शहर अभियंता , अतिरिक्त आयुक्त हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले होते.