कल्याण - घराचे रजिस्ट्रेशन करून देण्याच्या बदल्यात १२ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कल्याण पूर्वेतील रजिस्ट्रेशन कार्यालयातील सहाय्यक दुय्यम निबंधकाला ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या सहाय्यक दुय्यम निबंधकाचे नाव राज कोळी असे आहे.कल्याण पूर्वेतील एका नागरीकांने त्यांच्या घराचे रजिस्ट्रेशनसाठी रजिस्ट्रेशन कार्यालयाकडे अर्ज केला होता. त्याचा रजिस्ट्रेशनसाठी नंबर आला असता त्याच्याकडे सहाय्यक दुय्यम निबंधक कोळी याने २४ हजार रुयांची मागणी केली होती.
अर्जदार पैसे देत नसल्याने रजिस्ट्रेशन करण्यास कोळी यांच्याकडून टाळाटाळ केली जात होती. अर्जदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे कार्यालयास या प्रकरणी तक्रार केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे कार्यालयातील पाेलिस पथकाने आज सापळा रचला होता. २४ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडी अंती १२ हजार रुपये देण्याचे ठरले होते. अर्जदाराकडून १२ हजार रुपयांची लाच स्विकारताना सहाय्यक दुय्यम निबंधक कोळी याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. कोळी याच्यासह त्याच्यासोबत असलेल्या एका खाजगी इसमालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत रजिस्ट्रेशनची पाच कार्यालये आहे. या कार्यालयात घर नोंदणीकरीता अर्ज केल्यावर त्यांचा नंबर आल्यावर त्यांना टोकन दिले जाते. त्यानुसार त्यांचे रजिस्ट्रेशन केले जाते. महापालिका हद्दीत अनेक बेकायदा बांधकाम असलेल्या इमारतींमधील घरांचे बेकायदेशीरपणे रजिस्ट्रेशन केले जात असल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वीही करण्यात आल्या आहे. त्यामुळे रजिस्टेशन कार्यालये वादाच्या भोवऱ््यात आहे. आज सहाय्यक दुय्यम निबंधकालाच लाच स्विकारताना रंगेहाथ पकडल्याने पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन कार्यालयातील गैरकारभार चर्चेत आला आहे.