मुरलीधर भवार, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : दसऱ्याला झेंडूच्या फुलांना फूल बाजारात चांगली मागणी असेल या अपेक्षेने नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील विंचूर येथून आलेल्या योगेश अंकुरणीकर या शेतकऱ्याला फुले आणणे भाड्याला महाग झाले. झेंडूला किलोमागे किमान ५० रुपये दर मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, योगेशला जेमतेम २० ते ३० रुपये दर मिळाला. झेंडू पिकवण्यासाठी मेहनत केलेले अंकुरणीकर आपल्या टेम्पोतील शिल्लक झेंडूंच्या फुलांवर थोडीशी विश्रांती घेण्यासाठी पडले होते. एक वडापाव खाऊन भूक भागवली. सारेच शेतकऱ्यांच्या हिताची फक्त भाषा करतात, पण शेतकरी असा चोहोबाजूने पिचलाय, अशी खंत त्यांनी ‘लोकमत’कडे बोलून दाखवली.
योगेश अंकुरणीकर हे झेंडूच्या फुलांची शेती करतात. त्यांनी पंधरा गुंठे जागेत लाल झेंडूच्या फुलाचे पीक घेतले. दसऱ्याला चांगला भाव मिळणार, अशी त्यांना अपेक्षा होती. पहिल्या खुड्यात त्यांच्या हाती २०० क्रेट माल निघाला. एका क्रेटमध्ये आठ किलोचा माल असतो. त्यांना फूलशेतीसाठी १५ हजार रुपये उत्पादन खर्च आला. हा माल घेऊन २२ ऑक्टोबरला रात्री ११ वाजता ते विंचूर येथून निघाले. त्यांना कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती गाठण्यासाठी पहाटे ४ वाजले. या प्रवासादरम्यान त्यांना तीन टाेलनाके लागले. या टोलनाक्यांवर तीन टप्प्यात २४०, १४० आणि ७० रुपये टोल भरावा लागला.
सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. मात्र जो शेतकरी शेतातला माल घेऊन थेट बाजारपेठ गाठतो त्याचा माल हा टोलमुक्त असला पाहिजे, असे योगेश म्हणाले. मालवाहतूक गाडीला ७ हजार भाडे भरले. बाजारात आल्यावर झेंडूला किमान ५० रुपये किलोचा दर मिळणे अपेक्षित होते. तो केवळ २० ते ३० रुपये दराने विकला गेला. त्यामुळे उत्पादन खर्च आणि गाडीभाडे निघणे मुश्किल झाले. योगेश यांची केवळ फूलशेतीच नाही तर त्यांनी या आधी टोमॅटोचे पीक घेतले होते. बाजारभाव पडले. त्यामुळे त्यांची मदार दसऱ्यावर होती. दसराही फुकट गेला. आता त्यांच्या शेतात कांदा पीक आहे.
५०० रुपयांची पावती बाजार समितीत फाडली
विवेक आवटे हे जुन्नरचे शेतकरी आहेत. त्यांनी २३ ऑक्टोबरच्या पहाटेच कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती गाठली. त्यांनी लाल आणि पिवळा झेंडू बाजारात विक्रीसाठी आणला होता. एका रोपामागे २ रुपये खर्चाप्रमाणे २० हजार रुपये, औषध फवारणीसाठी पाच हजार रुपये, एक एकर जागेत ८ ते १० टन झेंडूचे पीक आले. गाडीभाडे सात हजार रुपये माेजावे लागले. बाजार समितीत ५०० रुपये पावती फाडावी लागली. हा सगळा खर्च पाहता बाजारात झेंडूला मिळालेला दर पाहता ५० टक्के तोटा सहन करावा लागला. गणपती उत्सवात चांगला दर मिळाला. पण दसऱ्याला दर पडले, असे त्यांनी सांगितले.
शेती सोडता येत नाही. करावीच लागते. त्यामुळे करणार काय? कल्याणला माल विकण्यासाठी आलो. रात्र टेम्पोत झोपून काढावी लागली. पोटाला आधार म्हणून वडापाव खाल्ला. निराशा उरी घेऊन गावी परतणार आहे. आमच्या घरी यंदा दसरा-दिवाळी सण कसा साजरा होणार? - योगेश अंकुरणीकर, शेतकरी, विंचूर, नाशिक.