उल्हासनगर : कॅम्प नं-४, शासकीय प्रसूतीगृह रुग्णालया समोरील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमला शनिवारी दुपारी आग लागून एटीएम जळून खाक झाले. महापालिका अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणलीतरी, आगीत एटीएम मशीन मधील लाखो रुपये जळून खाक झाल्याचे बोलले।जात आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४, शासकीय प्रस्तुतीगृहाच्या समोरील आयसीआयसीआय बँकेची एटीएम मधून दुपारी धूर निघत असल्याची माहिती महापालिका अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके यांना मिळाली. त्यांनी अग्निशमन दलाच्या पथकासह धाव घेऊन काही तासात आग विझविण्यात आली. मात्र तोपर्यंत एटीएमची यंत्रणा जळून खाक झाली होती. हे एटीएम बाजारपेठेच्या मुख्य रोडवर असल्याने आग विझेपर्यंत रस्ता बंद करण्यात आला होता. ही आग नेमक्या कोणत्या कारणास्तव लागली. हे निश्चित सांगता येत नसले तरी उन्हाचा पारा वाढल्याने शॉर्ट सर्किटने आग लागण्याची शक्यता अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी बाळू नेटके यांनी व्यक्त केले. आगीत लाखो रुपये जळल्याचेही बोलले जात आहे. अधिक तपास विठ्ठलवाडी पोलीस करीत आहे.