कल्याण- कल्याण-डोंबिवलीत रिक्षा बंदवरुन सध्या चांगलचं वातावरण पेटलं आहे. कोकण रिक्षा टॅक्सी चालक संघटनांकडून १ ऑगस्टपासून अनिश्चित कालावधीसाठी रिक्षा बंदची हाक देण्यात आलीय. मात्र या बंदमध्ये आम्ही सहभागी होणार नाही, असं कल्याण डोंबिवलीतील काही रिक्षा संघटनांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर आमच्या जीवाला धोका आहे त्यामुळे आम्हाला पोलीस संरक्षण द्या, अशी धक्कादायक मागणीही करण्यात आली.
सीएनजीच्या दरात मागील वर्षभरात २८ रुपयांची वाढ झाली असतानाही रिक्षा भाडे वाढविण्यात आलं नाही. वारंवार मागणी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने लाखो रिक्षाचालक आपलं स्टेयरिंग अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवणार आहेत. १ ऑगस्ट पर्यत रिक्षा भाडे वाढविण्याबाबतचा निर्णय न घेतल्यास कोंकण विभागातील ४ जिल्ह्यातील सुमारे २ लाख ५० हजार रिक्षा चालक ३० जुलैच्या रात्रीपासून प्रवासी भाडे न आकरता संप पुकारणार असल्याचं जाहीर करण्यात आलय. मात्र या संपाला अन्य संघटनांनी विरोध दर्शवला आहे.
डोंबिवलीतील पाच तर कल्याण मधील ६ रिक्षा संघटना- युनियन सहभागी होणार नसल्याचं सांगण्यात आलय. इतकंच नाही तर ज्यांनी संप पुकारला आहे त्यांच्यपासून आमच्या जीवाला धोका आहे असे सांगत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण परिमंडळ -३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेऊन निवेदन दिले. याबाबत संजय देसले, नंदू परब, दत्ता माळेकर, प्रमोद गुरव यांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ९० टक्के रिक्षाचालकांनी रोज रिक्षा चालवली तरच त्यांचं घर चालतं. आधीच कोरोना काळात रिक्षाचालकांचे हाल झालेत. त्यात हा बेमुदत संप परवडणार नाही, असं या पदाधिका-यांचं म्हणणं आहे.
विशेष बाब म्हणजे या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपसह आरपीआय व इतर पक्षांच्या प्रभावाखाली असलेल्या संघटना एकत्रित आल्यात. प्रणित रिक्षा संघटनाही एकत्रित आल्यात. मात्र दुसरीकडे संप पुकारणा-एससी संघटनेवर सुद्धा सेनेचं वर्चस्व असल्याने हा वाद आता कुठे जातो? ते पाहव लागणार आहे. पण, प्रवाशांच्या तक्रारीसाठी इतक्या आक्रमकपणे कधीही एकत्र न येणाऱ्या या संघटना केवळ एका संघटनेला विरोध करण्यासाठी आणि थेट पोलिसांना निवेदन देण्यासाठी एकत्र आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.