डोबिंवली : कल्याण-डोंबिवलीत फेरीवाला पथकावर हल्ला झाल्याची घटना ताजी असताना काल उघड्यावर कचरा टाकल्याप्रकरणी कारवाई करणाऱ्या भरारी पथकाच्या प्रमुखाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
डोंबिवली पूर्वेतील टाटा लाईननजीक एक इसम उघड्यावर कचरा टाकत असल्याची बाब महापालिकेच्या भरारी कारवाई पथकाच्या निदर्शनास आली. भरारी पथकाचे प्रमुख दिगंबर वाघ यांच्या पथकाने उघडयावर कचरा टाकणाऱ्या पकडून त्याला गाडी बसविले. त्याच्याकडून दंडाची रक्कम भर व त्याची पावती फाड अशी मागणी केली. त्यावेळी अन्य एक इसम त्याठिकाणी आला. त्यांनी गाडीचे स्विच तोडून ते दिंगबर यांच्या डोक्यात मारले आणि जखमी केले. त्याबरोबर भरारी पथकाच्या गाडीची काच फोडली आणि दंड भरण्यास नकार दिला.
याप्रकरणी दिगंबर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असती पोलीस घटनास्थळी आले. या प्रकरणी पोलिसांनी रमेश रामफकीर पटेल, महेश रामफकीर पटेल आणि अमोल विचारे या तिघांना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करुन सरकारी अधिकाऱ्यास मारहाण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील अन्य एक आरोपी नितीन यादव याला अद्याप अटक झालेली नव्हती.
रमेश पटेल यांची चायनीजची गाडी आहे. चायनीज गाडीवरील एक गोणीभर कचरा तो टाटा लाईनजवळ उघड्यावर टाकत असताना पथकाने कारवाई केली म्हणून ही घटना घडली. रस्त्यावर कुठेही कचरा टाकणाऱ्या विरोधात कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाने प्रत्येक प्रभागात भरारी पथकाची निर्मिती केली आहे. ऑगस्ट महिन्यापासून ही कारवाई सुरु आहे. दिगंबर यांच्या पथकाने ऑगस्टपासून आतापर्यंत उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांकडून ९ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.