लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : साईनगर शिर्डी एक्स्प्रेसमध्ये शुक्रवारी पहाटे आई झाेपेत असताना एका दीड वर्षाच्या मुलीला चोरण्याचा प्रयत्न प्रवाशांनी हाणून पाडला. प्रवाशांनी चोरट्याला पकडून कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सलीम पठाण (रा. येवला, नाशिक) असे चाेरट्याचे नाव आहे. मुलीला पोलिसांनी तिच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नालासोपारा परिसरात राहणारे राकेश गुप्ता हे त्यांची पत्नी आणि दीड वर्षाची मुलगी सृष्टीला घेऊन साईनगर शिर्डी एक्स्प्रेसने प्रवास करत होते. शुक्रवारी पहाटे ही एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने येत असताना त्यांच्या पत्नीला झोप लागली, तर राकेश हे लघुशंकेसाठी गेले होते. दीड वर्षाची सृष्टी आईजवळ असताना तिच्यावर चाेरट्याची नजर गेली. संधी साधून मुलीला उचलून घेत तो तेथून निघाला. काही सतर्क प्रवाशांची नजर त्याच्यावर पडली. त्यांनी त्याला हटकले. तेव्हा ताे धड उत्तर देऊ शकला नाही. त्याचवेळी मुलीच्या आईला जाग आली. तिने मुलगी माझी असल्याचे सांगताच प्रवाशांनी मुलीला चोरून नेणाऱ्यास पकडले आणि रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. रेल्वे पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकेश ढगे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
मुलीची विक्री करण्याचा डाव?
आरोपी सलीम एक्स्प्रेसमध्ये कुठे चढला, त्याने मुलीवर पाळत ठेवली होती का, मुलीला चोरून तो तिचे पुढे काय करणार होता, कोणाला विकणार होता का, या प्रश्नांभोवती रेल्वे पाेलिस तपास करत आहेत. त्याने यापूर्वी असे काही गुन्हे केले आहेत का, याचाही पोलिस शोध घेत आहेत.