कल्याण-डोंबिवली शहरात रिक्षा चालक आणि प्रवासी यांच्यामध्ये कायमच खटके उडतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियम अधिक कडक केल्यामुळे वाद होण्याच प्रमाण अधिक वाढलंय. एकीकडे रुग्णाचे नातेवाईक बेड, इंजेक्शन आणि इतर गोष्टींसाठी धावाधाव करतायेत मात्र इमर्जन्सीच्या वेळी काही रिक्षा चालकांकडून मनमानी पद्धतीने भाडं आकारल जात असल्याने सामान्य नागरिकांचा रिक्षा प्रवासही कठीण झाला आहे. संपूर्ण कल्याण डोंबिवली शहरात एकही रिक्षा मीटर पद्धतीने धावत नसल्याने मनाला येईल तो आकडा रिक्षाचालकांकडून सांगितला जात आहे.
कोरोनाच्या काळात अनेक रिक्षाचालकांनी माणुसकी व प्रामाणिकपणा राखला यात शंका नाही. याअगोदर रिक्षाचालकांच्या देखील समस्या लोकमतने मांडल्यात. मात्र काही रिक्षाचालक गणवेश न घालणे, प्रवास करताना मास्क न लावणे, अव्वाच्या सव्वा भाडं आकारण अशा गोष्टी देखील केल्या जातायेत. ही लढाई आपल्या सर्वांची असल्याने सर्व घटकांनी एकमेकांना समजून घेणं महत्वाचं आहे. वाहतूक विभाग, प्रवासी संघटना, आरटीओ, रिक्षा संघटना यांच्यात योग्य तो समन्वय असणं अत्यंत गरजेच आहे.