कल्याण-कल्याण पश्चिमेतील भोईर चौक ते उंबर्डे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे या परिसरातील नागरीकांचे कंबरडे मोडले आहे. कंबरतोड प्रवास करीत नागरीकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करणा:या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात यावा अशी उपरोधिक मागणी कल्याण विकासिनी या सामाजिक संस्थेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्याकडे करण्यात आली आहे.
कल्याण विकासिनी या सामजिक संस्थेचे अध्यक्ष अॅड. उदय रसाळ यांनी या प्रकरणी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. भोईर चौक ते उंबर्डे या रस्त्यावर गेल्या चार महिन्यापासून खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या नागरीकांना कंबरतोड प्रवास करावा लागत आहे. तसेच मणक्याचे आजार त्यांना होऊ लागले आहेत. रस्त्यावरील खड्डे पाहता खड्डे बुजवले जात नसल्याने खड्ड्यातून प्रवास करणाऱ्या सहनशील नागरीकांना महापालिकेने उपचारासाठी सानुग्रह अनुदान जाहीर करावे. दिवाळीत बोनस घेऊन आणि सातव्या वेतनाप्रमाणे पगार लाटणारे अधिकारी नागरिकांच्या हिताची कामे करण्यास असमर्थ ठरत असतील तर त्यांचे सानुग्रह अनुदान नागरीकांच्या उपचाराकरीता मिळावे. ज्या तत्परते महापालिका प्रशासनाने या रस्त्याचे काम हाती घेतले. ते काम पूर्ण करण्यात प्रशासनाने तत्परता दाखविली नाही. काम कासव गतीने सुरु आहे असे म्हटल्यास कासव गती तरी गतीशील असेल पण कामाची गती त्यापेक्षा कमी आहे. कामाचे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांना भारत रत्न देऊन गौरव केला तर त्यांच्या अकार्यक्षमतेचा गौरव हा कमीच पडेल, असे प्रश्न विकासिनीच्या माध्यमातून रसाळ यांनी उपस्थित केले आहेत.
गणेशाचे आगमन खड्डेमय रस्त्यातून झाले. आत्ता नवरात्री उत्सव आहे. त्यानंतर दिवाळी आहे. दरवर्षी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. यंदा जवळपास १५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. हा पैसा नक्की कुठे खर्च केला जातो. केवळ माती आणि खडी टाकून खड्डे बुजविण्याचे काम करणाऱ्या कंत्रटदाराच्या खिशात घातला जातो का असा प्रश्न दरवर्षी उपस्थित केला जातो. अधिकारी, कंत्रटदार यांच्या साटेलोटे यांच्या पुढे आयुक्तही हतबल झाले आहेत का असे म्हणत त्यांनी कानउघणीही केली.