कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत जवळपास वर्षभरापासून अधिक काळ विविध कोविड सेंटर मध्ये जीवाची पर्वा न करता घरदार विसरून कोरोनाशी लढा देत आहे. योध्दाच्या संरक्षणासाठी बहुतेक सामाजिक संस्था यांनी चांगले उपक्रम हातात घेऊन मदतीचा हात पुढे केला आहे. या पार्श्वभूमीवर "द बेबी केयर फाऊंडेशन"तर्फे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला 100 पीपीई किट्स भेट देण्यात आल्या आहेत.
अक्षय तृतीया व रमजान ईद च्या शुभमुहूर्तावर रुग्णालयात व इतर ठिकाणी कर्तव्यनिष्ठ कार्य बजावत असलेले डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, वार्ड बॉय, ॲम्बुलन्स ड्रायव्हर, पोलीस, व सर्व कर्मचारी यांच्या संरक्षणासाठी या किट देण्यात आल्या. याअगोदर आम्ही बस डेपो, कोविड सेंटर व इतर ठिकाणीही पीपीई किट दिल्या आहेत. आदिवासी पाड्यांवरील मुलांना शैक्षणिक साहित्य पुरविण्याचे देखील आम्ही काम करतो.
तसेच अनेक आदिवासी भागात योजनेच्या माध्यमातून शौचालय उभारण्याचे काम देखील केल्याचे द बेबी केअर फाऊंडेशनचे संस्थापक सुजित नेमन यांनी सांगितले. तर संस्थेने कोरोना काळात काम करणाऱ्या सर्व कर्मचा-यांविषयी दाखवलेल्या कृतज्ञतेबद्दल पालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी संस्थेचे आभार मानले.तसेच लॉकडाऊन मूळे व ठिकठिकाणी काम करणा-या कोरोना योध्यामूळे रुग्णसंख्या कमी होत असल्याचेही ते म्हणाले.