कल्याण: कल्याण-मुरबाड रस्त्यावरील म्हारळ ते टाबोर आश्रमादरम्यान रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविले गेलेले नाही. यासाठी संतप्त नागरीकांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदूराव यांच्या पुढाकाराने हे बेमुदत उपोषष सुरु करण्यात आले आहे. २९ सप्टेंबर रोजी हिंदूराव यांच्या पुढाकाराने महेश देशमुख, अश्वीन भोईर, विवेक गंभीरराव, विशाल मोहपे, योगेश देशमुख, लक्ष्मण सुरोशी, निकेश पावशे, अशफाक शेख, प्रवीण नागरे, दत्तू सांगळे, दिलीप भोईर, जगन्नाथ शेट्टी, रमेश गायकवाड आदींना याच रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या मागणीकरीता आंदोलन केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तृप्ती नाग यांनी आंदोलन करणाऱ्यांना लेखी आश्वासन दिले होते. २० ऑक्टोबर्पयत या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल, असे आश्वासीत केले होते. २० ऑक्टोबर ही तारीख उलटून गेली तरी प्रत्यक्षात काही एक कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नागरीकांनी पुन्हा बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
रस्त्यावरील खड्डे कायम आहेत. तसेच रस्त्यावरील चिखल माती सुकल्याने धूळीचा सामना वाहन चालकांसह प्रवाशांना करावा लागतो. कल्याण मुरबाड ते नगर हा दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. या दिशेने प्रवासीकरीता रेल्वेची सुविधा नाही. कल्याण ते मुरबाड दररोज हजारो प्रवासी बस, सहा आसनी टॅक्सी टेम्पोने वाहतूक करतात. त्याचबरोबर मुरबाडहून शालेय विद्यार्थी कल्याणच्या दिशेने शिक्षणासाठी येतात. याशिवाय कांबा, म्हारळ, वरप या ठिकाणी नवी गृहसंकुले उभी राहिली आहेत. या नागरीकांना रस्त्यावरील खड्डय़ाचा सामना करावा लागतो. नगरहून कल्याणला रोज पहाटे भाजीपाला फळे यांची वाहतूक करणा:या गाडय़ा येतात. यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजविले जाणो आवश्यक आहे. यासाठी हे बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे. आत्ता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही असा इशारा हिंदूराव यांनी दिला आहे.