कल्याण: केवळ एक नाही तर असे अनेक प्रकल्प आहेत की ज्यावरून खराब कंत्राटदारांचा ठाणे जिल्हयाला शाप असल्याचे स्पष्ट होत असल्याचे उद्विग्न उद्गार केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी काढले. केडीएमसीतर्फे आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानासाठी ते कल्याणात आले होते. त्यावेळी माध्यमांनी शहरांच्या बकालपणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या स्वच्छता पंधरवड्याअंतर्गत केडीएमसी प्रशासनातर्फे दुर्गाडी किल्ला परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्यात पाटील हे स्वत: हातात झाडू घेऊन सहभागी झाले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाचा विकास होत असताना तो स्वच्छही असला पाहिजे. मात्र केवळ स्वच्छता पंधरवड्यापुरता हे स्वच्छता अभियान न राबवता दररोज झाले पाहिजे. शहरातील नागरिकांनीही स्वच्छतेची शपथ घेऊन त्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला तर राज्यातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून कल्याण अग्रस्थान पटकावेल असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
या स्वच्छता अभियानात माजी आमदार नरेंद्र पवार, शिवसेनेचे शहरप्रमूख रवी पाटील भाजपचे शहराध्यक्ष वरुण पाटील, केडीएमसीचे ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. प्रशांत पाटील, केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, उपायुक्त अतुल पाटील, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, माहिती जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव यांच्यासह अनेक अधिकारी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नागरिकांनी एक दबावगट तयार केला पाहिजे
शहरातील रस्त्यांची कामे असो की स्वच्छतेची की आणखी कोणती. ही कामे चांगली होण्यासाठी नागरिकांनीही एक दबावगट तयार केला पाहिजे. ज्यातून शहरात होणाऱ्या कामांवर लक्ष आणि प्रशासनावर त्याचा अंकुश राहू शकेल. तर शहरातील बकालपणाबाबत आपण महापालिका अधिकाऱ्यांना अजिबात पाठीशी घालणार नसून लवकरच या प्रश्नांबाबत केडीएमसी प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.