कल्याण : बदलापूर रेल्वे स्थानकात मंगळवारी झालेल्या जनआंदोलनात सुरुवातीला बघे होत व कालांतराने जनक्षोभाच्या लाटेवर अनेक सामान्य मध्यमवर्गीय नागरिकही आरूढ झाले. मात्र, यातील अनेकांची मंगळवारची रात्र रेल्वे पोलिसांच्या कोठडीत गेली असून, बुधवारची रात्र आधारवाडी कारागृहात जाण्याचे संकेत आहेत. सामूहिक उद्रेकात अनेकदा सामान्य नागरिक पोलिसांच्या चक्रव्युहात फसतात, याचा दाखला आता या आंदोलनातून पाहायला मिळतो आहे.
लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ बदलापूर रेल्वे स्थानकात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केले. यात अटक झालेल्या दीपक शिखरे यांच्या पत्नी यांनी सांगितले, की दीपक कामावर जाण्याकरिता मंगळवारी बदलापूर स्थानकात आले. रेल रोको आंदोलनामुळे रेल्वे गाड्या ठप्प होत्या. तेव्हा ते आंदोलन बघण्यासाठी थांबले. त्यांचा आंदोलनाशी काही एक संबंध नव्हता. पण, पोलिसांनी त्यांनाच अटक केली. आता माझे पती दीपक यांना तुरुंगातून सोडविण्याकरिता कुठून पैसा आणायचा? असा सवाल त्यांनी केला.
दीपक यांच्या सुटकेसाठी नीरा शिखरे मंगळवारी रात्रीपासून धावपळ करीत आहेत. त्यांनी बुधवारी सकाळी कल्याण रेल्वे पोलिस ठाणे गाठले. वकिलांनी त्यांच्या पतीसाठी सुटकेसाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे सांगितले. मात्र, दुपारी १२:०० वाजता त्यांच्या पतीसह २२ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्याचे कळताच त्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला.
बदलापूर स्टेशन परिसरात राहणाऱ्या रिमा गुप्ता यांनी सांगितले की, त्यांचा भाऊ अरविंद गुप्ता हा डोंबिवलीतील केअर नर्सिंगमध्ये कामाला आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता कामावर जाण्याकरिता त्याने बदलापूर रेल्वे स्थानक गाठले. पण, पोलिसांनी त्याला आंदोलनातील सहभागासाठी अटक केली. आई वंदना गुप्ता यांनी मुलाच्या अटकेचा मोठा धसका घेतलाय. अरविंदचा आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग नसताना पोलिसांनी कशाच्या आधारे अटक केली, असा सवाल गुप्ता कुटुंबीयांनी केला आहे.
प्रणीत कुंभारे हे वडाळा येथील एका विमा कंपनीत सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. ते उल्हासनगरला राहतात. बदलापूरमध्ये आंदोलन सुरू असल्याचे कळल्याने काय झाले, हे पाहण्यासाठी ते बदलापूरला आले. त्यांनाही पोलिसांनी काही एक संबंध नसताना तुरुंगात टाकले, असा त्यांच्या पत्नी मिता यांचा दावा आहे.