Badlapur School Crime Case : बदलापूर एका नामांकित शाळेत दोन चार वर्षांच्या मुलींच्या लैंगिक शोषणाच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणी आरोपी शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आलीय. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे या प्रकरणात शाळा प्रशासन आणि पोलिसांविषयीही नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. घटना घडल्यानंतर आठवड्याभरानंतर ही घटना उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. तसेच पीडितांच्या कुटुंबियांनीही शाळेवर आणि पोलिसांवर गंभीर आरोप लावले आहेत. सुरुवातीला शाळेने या घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला.
बदलापूरच्या शाळेत लैंगिक अत्याचार झालेल्या एका मुलीच्या कुटुंबीयांनी शाळा प्रशासन आणि पोलिसांवर निष्काळजीपणा आणि छळ केल्याचा आरोप केला आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलीवर लैंगिक अत्याचार झालेला वैद्यकीय अहवाल नाकारल्याचाही आरोप कुटुंबीयांनी केला. डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल स्वीकारण्याऐवजी मुख्याध्यापकांनी सांगितले सायकल चालवल्यामुळे मुलीच्या गुप्तांगाला दुखापत झाली असावी, असं म्हटल्याचा दावा कुटुंबियांनी केला.
इंडिया टुडे वृत्तानुसार, पीडित कुटुंबातील सदस्याने सांगितले की, "मुलीच्या पालकांना हॉस्पिटल आणि पोलीस ठाण्यामध्ये बराच वेळ थांबावे लागले. पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना धमकावले आणि या प्रकरणाशी संबिधत आंदोलनामध्ये भाग घेऊ नका असं सांगितले. या घटनेची माहिती शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांना देण्यात आली, मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. अत्याचार झाला सांगणारा वैद्यकीय अहवाल असूनही, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी दावा केला की ही दुखापत शाळेच्या बाहेर किंवा सायकल चालवताना झाली असावी."
मुली शौचालयाचा वापर करत असताना तिथे महिला कर्मचारी का नव्हता, अशी विचारणाही मुलीच्या पालकांनी शाळेला केली. त्यावेळी शाळेतील आणखी एका विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण झाल्याची घटना यापूर्वी घडल्याचे त्यांना समजले. त्याच शाळेतील एका पुरुष शिक्षकाने आठवीच्या वर्गातल्या मुलीसोबत असाच गुन्हा केल्याचे आम्हाला समजले, असा दावा कुटुंबीयांनी केला. तसेच ही घटना लपवण्यासाठी एका महिला पोलिसाने शाळा व्यवस्थापनासोबत गुप्त बैठक घेतल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला. या बैठकीनंतर वैद्यकीय पुरावे असूनही आमचे दावे फेटाळले. त्यांनी आम्हाला अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगितले आणि खोट्या बातम्या पसरवू नका असे सांगितले.
१२ आणि १३ ऑगस्ट रोजी आरोपी अक्षय शिंदेने पीडित दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले होते. एका मुलीच्या कुटुंबीयांनी तिला वैद्यकीय तपासणीसाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्या वैद्यकीय अहवालात मुलींच्या गुप्तांगाला दुखापत झाल्याचे समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी हा अहवाल १६ ऑगस्ट रोजी शाळेत नेला. मात्र शाळेने तो फेटाळून लावला होता. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी खासगी संस्थाची मदत घेत याप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतला.