डोंबिवली : प्रवासादरम्यान डोंंबिवली लोकलमध्ये विसरलेली प्रवाशाची पायलट ईव्हीएम प्रोजेक्ट मशीन असलेली बॅग डोंबिवली रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांकडून संबंधित प्रवाशाला शोधून सुपुर्द करण्यात आली. शनिवारी ही घटना घडली.अमरावती येथे राहणारे आनंद पी. मिश्रीकोटकर हे शनिवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे डोंबिवली या धीम्या गतीच्या लोकलमध्ये चढले. त्यांनी त्यांची बॅग खिडकीवरील रॅकवर ठेवली. समोरील फलाटावर जलद गतीची लोकल आल्यावर ते त्या लोकलमधून प्रवास करण्यासाठी धीम्या गतीच्या लोकलमधून उतरले. मात्र, जलदगती लोकल फलाटावरून निघून गेली. त्यावेळी आपल्याकडील बॅग धीम्या गतीच्या लोकलमध्ये विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले; पण तीही लोकल फलाटावरून निघून गेली.आनंद यांनी तेथील रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना याची माहिती दिली. त्यांनी तत्काळ १८२ या हेल्पलाइन नंबरवर या घटनेची माहिती दिली. आनंद यांच्या बॅगेत ३५ हजारांचे पायलट ईव्हीएम प्रोजेक्ट मशीन होते. ही माहिती डोंबिवली रेल्वे सुरक्षा बलाला मिळताच तेथील कामिनी सोनकर आणि सिद्धार्थ कोळे यांनी डोंबिवलीत लोकल आल्यावर रेल्वे डब्यात शोध घेतला असता संबंधित बॅग मिळून आली. सुरक्षा बलाचे डोंबिवली पोलीस निरीक्षक हरफुलसिंह यादव यांनी ती बॅग आनंद यांच्या ताब्यात दिली. आनंद हे एका खाजगी कंपनी काम करतात. शनिवारी ते मंत्रालयात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसमोर पायलट ईव्हीएम प्रोजेक्ट मशीनचा डेमो देण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना ही घटना घडली. लोकल डब्यात विसलेली बॅग मिळवून दिल्याने त्यांनी रेल्वे सुरक्षा बलाचे आभार मानले.
ईव्हीएम प्रोजेक्ट मशीन असलेली बॅग लोकल प्रवासात हरवली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 2:15 AM