कल्याण - कल्याण शीळ रस्त्यालगत असलेल्या पिसवली गावाच्या कमानी समोरच गोणी भरुन मतदार ओळख पत्रे सापडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गोणीत मिळून आलेली मतदार ओळख पत्रे ही नेतीवली, सूचक नाका या परिसरातील आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत कल्याण लोकसभा मतदार संघातून ८० हजारापेक्षा जास्त मतदारांची नावे मतदार यादीतून गायब होती. त्यामुळे या मतदारांना मतदारानाचा हक्क बजाविता आला नाही. त्या प्रकरणाशीच हा प्रकार संबंधित असावा असा प्राथमिक अंदाज या प्रकरणी व्यक्त केला जात आहे.
काल रात्रीच्या सुमारास पिसवली गावाच्या कमानी समोरील रस्त्यावर गोणी भरून मतदार ओळखपत्र आढळून आले . मतदार ओळखपत्रांची गोणी काही नागरिकांच्या निदर्शनास आली. हा प्रकार कळताच या भागात नागरीकांची गर्दी जमा झाली होती .नागरिकांनी ही मतदार ओळखपत्र जमा करून या घटनेबाबत मानपाडा पोलिसांना माहिती दिली .पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ही मतदार मतदार ओळख पत्रे ताब्यात घेतली आहेत. ही मतदार ओळख पत्रे याठिकाणी कोणी टाकली याचा तपास पोलिस करीत आहेत.
उद्दव सेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष वैशाली दरेकर यांनी सांगितले की, सापडून आलेली गोणीभर ओळख पत्रे ही खरी आहे की बनावट ? या खुलासा निवडणूक आयोग आणि पोलिसांकडून झाला पाहिजे. लोकसभा निवडणूकीत मतदार यादीतून ८० हजारापेक्षा जास्त मतदारांची नावे गायब होती. या मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्यासाठी ही मतदार ओळख पत्रे गोणी भरुन ठेवली.
निवडणूक झाल्यावर ती बाहेर आली आहेत. गोणीत मिळून आलेली मतदार ओळख पत्रे बनावट असतील तर त्या नावाने काेणी बोगस मतदान करुन मग ही ओळख पत्रे फेकून दिली आहे का ? या सगळ्या प्रश्नाची उत्तरे निवडणूक आयोगाने द्यावीत. पोलिसांनी याचा वस्तूनिष्ठ तपास करावा. खरे सत्य बाहेर काढावे.