कल्याण : शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांचे देशातील पहिले स्मारक चार वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली महापालिकेने पश्चिमेतील काळा तलाव येथे उभारले होते. मात्र, या स्मारकाची जागा महापालिकेच्या नावे नव्हती. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त शनिवारी या जागेचा सातबारा महापालिकेच्या नावे झाल्याची माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन बासरे यांनी दिली आहे.
ऐतिहासिक काळा तलाव परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबाचे वास्तव्य होते. या तलावाचा विकास हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. २००८ पासून १० कोटी खर्चून काळा तलावाच्या विकासाला सुरुवात झाली. २०१२ मध्ये विकासकाम पूर्ण झाल्यावर या स्मारकाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले होते. मात्र, या स्मारकाची जागा एका खासगी मालकाची होती. त्याने २० वर्षांपूर्वी या जागेचा टीडीआर घेतला होता. ही जागा आरक्षित असल्याने ती महापालिकेच्या नावे झाली नव्हती. ती महापालिकेच्या नावे करण्याची प्रक्रिया माजी नगरसेवक सचिन व सुधीर बासरे यांनी केली. सरकार दरबारी पाठपुरावा केल्यानंतर या जागेचा सातबारा महापालिकेच्या नावे झाला आहे. त्याची कागदपत्रे बासरे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना सुपूर्द करणार आहेत.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत होणार विकासस्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत काळा तलावाचा विकास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, स्मार्ट सिटी प्रकल्प कंपनीने त्याला मंजुरी दिली आहे. तसेच लवकरच काळा तलावाच्या दुसऱ्या टप्प्यातील विकास कामालाही सुरुवात होणार असल्याचेही बासरे यांनी सांगितले.