कल्याण-खोटय़ा कागदपत्रांच्या आधारे कल्याण डोंबिवली महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळविल्याचे भासविले. या खोटय़ा परवानगीच्या आधारे रेरा प्राधिकरणाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळविले. या फसवणूक प्रकरणी ४० बिल्डरांची बँक खाती गोठविण्याची कारवाई एसआयटीने केली आहे. तसेच सरकारी आरक्षित जागेवर बेकायदा बांधकाम कोणी केले आहे याचीही देखील माहिती एसआयटीने संबंधित सरकारी यंत्रणांकडून मागविली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सही शिक्का तयार करुन त्या आधारे महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळविली. या परवानगीच्या आधारे रेरा प्राधिकरणाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळविले. हे प्रकरण माहिती अधिकारात वास्तू विशारद संदीप पाटील यांनी उघडकीस आणले. या प्रकरणी त्यांनी प्रथम महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली. या प्रकरणी चौकशीचा मागणी केली. त्याचबरोबर उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली. त्यानंतर महापालिकेने डोंबिवली शहर आणि २७ गावातील ग्रामीण भाग मिळून ६५ बिल्डरांच्या विरोधात गुन्हे दाखल केले. हे गुन्हे दाखल झाल्यावर या प्रकरणी चौकशीकरीता ठाणो पोलिस आयुक्तांनी एसआयटी नेमली. दरम्यान रेरा प्राधिकरणाने ६५ बिल्डरांपैकी ५२ बिल्डरांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याची कार्यवाही केली. एसआयटीकडून तपास सुरु झाला असताना दरम्यान ईडीकडूनही या प्रकरणाची कागदपत्रे महापालिका आयुक्तांकडून मागविण्यात आली.
आत्ता एसआयटीने फसवणूक प्रकरणातील ६५ बिल्डरांपैकी ४० बिल्डरांची बँक खाती गोठविण्याची कार्यवाही केली आहे. खोटया कागदपत्रांच्या आधारे बिल्डरांनी जमिनीचे व्यवहार केले आहेत. तसचे सरकारी आरक्षित जागेवर बांधकाम झाले आहे याची माहिती मागविली आहे. तहसीलदार, ठाणे जिल्हाधिकारी आणि रजिस्ट्रेशन कार्यालयाकडून ही माहिती मागविली आहे. ज्या नागरीकांनी या बिल्डरांकडून घर खरेदी केले आहे. त्याची फसवणूक होऊ नये सासाठी रजिस्ट्रेसन ऑफिसला सूचित करण्यात आले आहे. कोणत्या बांधकाम प्रकरणात अनियमितता आहे. याची देखील माहिती महापालिका आयुक्तांकडे मागण्यात आली असल्याची माहिती एसआयटी सूत्रंकडून देण्यात आली आहे.
दरम्यान ६५ पैकी ७ बिल्डरांनी कल्याण न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी ४ बिल्डरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. याशिवाय ३ बिल्डरांना अटक पूर्व अंतरिम जामीन मंजूर करीत ३ आठवडय़ांची मुदत दिली गेली आहे.
दरम्यान या प्रकरणातील तक्रारदार पाटील यांना धमकविण्याचे फोन्स कॉल आले होते. टेक केअर असे मेसेज पाठविले गेले. या प्रकरणाची चौकशी करुन पोलिस संरक्षण मिळावे अशी मागणी पाटील यांनी पोलिस प्रशासनाकडे केली होती.