कल्याण : कोरोना काळात सुरुवाती पासूनच डॉक्टर्स, वैद्यकीय आणि आरोग्य कर्मचारी, पोलिस यंत्रणा, सफाई कामगार यांच्याबरोबरच देशाच्या अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा घटक असलेल्या बँकिंग क्षेत्रात कार्यरत असणारे बँक कर्मचाऱ्यांना सुद्धा फ्रंटलाईन वर्कर्स श्रेणीत समावेश करत कोरोना विरोधी लसीकरण मोहीमेत प्राधान्य द्यावे, अशी आग्रही मागणी बुधवारी लोकसभा अधिवेशनादरम्यान शुन्य प्रहर काळात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.
देशामध्ये १२ सार्वजनिक क्षेत्रातील बँक, २२ खाजगी बँक, ४४ विदेशी बँक, ५६ प्रादेशिक ग्रामीण बँक, १४८५ नागरी सहकारी बँक तर ९६००० ग्रामीण सहकारी बँका असून यात १५ लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला होता. रेल्वे तसेच बस सेवांवर प्रतिबंध असताना देखील कामावर हजर राहून तेव्हा अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्याचे काम तसेच विविध योजनां कार्यान्वित ठेवण्याचे काम या बँक कर्मचारी करत असताना काही कर्मचारी कोरोना बाधित झाले तर काहिंचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
या पार्श्वभूमीवर सर्व बँक कर्मचाऱ्यांना फ्रँटलाईन वर्कर्स श्रेणीत घेऊन त्यांना देखील कोरोना लसीकरण मोहिमेत प्राधान्य देऊन त्यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करता येतील, असे मत यावेळी व्यक्त केले.