अंबरनाथ: अंबरनाथमधून जाणाऱ्या कल्याण बदलापूर रस्त्याचे काम संथगतीने चालल्याचा आरोप करत आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. मागील ५ वर्षांपासून हे काम अतिशय संथगतीने सुरू असून याला आमदारांचा निष्क्रिय कारभार कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे अंबरनाथ शहरातील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
राज्य महामार्गाचा दर्जा असलेल्या कल्याण बदलापूर रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण एमएमआरडीए कडून केले जात आहे. गेल्या ५ वर्षांपेक्षाही जास्त कालावधीपासून हे काम सुरू असून अजूनही ते पूर्ण झालेले नाही. सध्या रेशनिंग ऑफिस ते मोरीवली नाक्यापर्यंतच्या पट्ट्यात हे काम सुरू आहे. मात्र हे काम अतिशय संथगतीने सुरू असून यामुळे स्थानिकांना त्रास होत असल्याचा आरोप केला जात आहे. याच रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून मेटलनगर भागातील रिक्षाचालक लल्लन यादव हे जखमी झाले. यादव यांचा पाय या अपघातात फ्रॅक्चर झाला असून त्यामुळे त्यांच्यावर सध्या घरी बसण्याची वेळ आली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आमदार डॉ. बालाजी किणीकर हे अधिकाऱ्यांसह या रस्त्याची पाहणी करणार होते. मात्र त्यापूर्वीच स्थानिकांनी ठिकठिकाणी आमदारांच्या निषेधाचे बॅनर लावत त्यांना काळे झेंडे दाखवायची तयारी केली. आमदारांच्या दौऱ्याची वेळ होताच आमदारांविरोधात घोषणाबाजीही सुरू करण्यात आली.
काँग्रेस आणि स्वाभिमान संघटनेनेही यावेळी स्थानिकांना पाठींबा दिला. या सगळ्याची माहिती मिळताच आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी कल्याण बदलापूर रस्त्याचा दौरा ऐनवेळी दौरा रद्द केला. तसेच एमएमआरडीए, अंबरनाथ नगरपालिका, महावितरण आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांची बैठक शासकीय विश्रामगृहात बोलावली. बैठक सुरू असतानाच शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर हे कुणालाही न कळवता अचानक तिथे दाखल झाल्याने अनेकांना घाम फुटला. यानंतर अधिकाऱ्यांनी आठ दिवसात सर्व अडथळे पूर्ण करत कामाला गती देण्याचे आश्वासन आमदार बालाजी किणीकर आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांना दिले. यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना बॅनरबाजीबाबत विचारले असता रस्त्याला दिरंगाई झाल्याचे त्यांनी मान्य केले, तसेच लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.