कल्याण - मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या राज्यभर दौऱ्यावर आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी केलेले उपोषण आंदोलन राज्यभर चर्चेत आले. त्यानंतर जिल्हाजिल्ह्यात मराठा आंदोलनाचा मुद्दा पुन्हा पेटू लागला. जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर सरकारला सुट्टी नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं. एकीकडे जरांगे पाटील यांच्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारची डोकेदुखी वाढली असताना दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार असलेल्या कल्याण मतदारसंघात जरांगेंच्या स्वागतासाठी शिंदे गटाचे बॅनर्स झळकले आहे.त्यामुळे या बॅनरची बरीच चर्चा शहरात होत आहे.
कल्याणमध्ये मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे. सायंकाळी ८ पर्यंत मनोज जरांगे पाटील कल्याणमध्ये येतील.जरांगे पाटील यांच्या स्वागताची आणि नियोजनाची जबाबदारी सकल मराठा समाजाकडून पार पाडली जाते. परंतु कल्याणमध्ये सत्ताधारी शिवसेना गटाने जरांगे यांच्या स्वागताचे बॅनर्स लावले आहे. कल्याण पूर्व येथील चक्कीनाका परिसरात हे बॅनर्स लागले आहेत. त्यात शिवसेनेचे अनेक नगरसेवक दिसत आहेत. कल्याण पूर्व चक्की नाका भागातील नगरसेवक नवीन गवळी यांच्या नेतृत्वात याठिकाणी जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
मराठा समाजावरील गेल्या ७० वर्षांवरील अन्यायाविरुद्ध लढा मायबाप जनतेच्या आशीर्वादासह सुरू केला आहे.मराठ्यांच्या लेकरांच्या भविष्यासाठी लढायचं असून, आपल्यावरील अन्याय बंद करायचा आहे. आपण ७० टक्के लढाई आपण जिंकली असून महाराष्ट्रात २९ लाख नोंदी सापडल्या आहेत. आरक्षण ७० वर्षांपूर्वी आरक्षण असते तर जगात सर्वात प्रगत मराठा समाज झाला असता त्यामुळे आतातरी आपल्यात मतभेद आणू नका.आरक्षण मिळेपर्यंत कोणाचंही ऐकू नका.आपल्या मुलांच्या हितासाठी लढायचं आहे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. त्याचसोबत आपल्याला राजकारण करायचे नाही कारण आजपर्यंत आपण खूप झेंडे उचलले. ज्यांना मोठे केले ते मागे राहायला तयार नाही. आपल्या मागे कोणी नाही हे लक्ष्यात आले अन् ज्याला मोठा केला तोच म्हणतोय मी आरक्षण मिळवू देणार नाही असे सांगत मी शांत आहे पण माझ्या वाटेला गेलो तर सोडत नाही असा इशाराही मनोज जरांगे-पाटील यांनी पुणे दौऱ्यात दिला.