अनिकेत घमंडी
डोंबिवली: दोन वर्षे कोरोनाचा काळ आणि त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा ५४ दिवसांचा राज्यव्यापी संप यामुळे लाल परीच्या तोट्यात वाढ झाली होती. आता मात्र गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणासह राज्यात अन्यत्र गणेशभक्तांनी जाण्यासाठी कल्याणच्या बस आगारातून आरक्षण करून प्रवास केला, त्यातून राज्य परिवहन महामंडळाला ७५ लाख ५० हजारांचे विक्रमी उत्पन्न मिळाले.
यंदाच्या वर्षी ३०२ बसेस गणेशोत्सव काळात सोडण्यात आल्या, त्यात कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, लांजा, कुडाळ आदी भागापर्यन्त बसेस सोडण्यात आल्या. प्रति बसमध्ये सरासरी ४४ प्रवासी होते असेही सांगण्यात आले. अशा पद्धतीने गणपतीच्या पहिल्या दिवसापर्यँत १३ हजार २८८ प्रवाशांनी त्या सेवेचा लाभ घेतला. प्रत्येक बस फेरीमागे सुमारे २५ हजार रुपयांचे उत्पन्न परिवहनला झाले. ही आकडेवारी केवळ कल्याण बस आगारामधून मिळालेल्या माहितीवरून सांगण्यात आली. गेल्या वर्षी याच मोसमात अवघ्या २०० बस फेऱ्या झाल्या होत्या, त्यात मात्र एवढी प्रवासी संख्या देखील नव्हती. यंदा त्या बस संख्येत १०३ ने वाढ झाली असून आर्थिक उलाढाल व प्रवासी संख्या देखील वाढले असल्याची माहिती आगार व्यवस्थापक विजय गायकवाड यांनी दिली.
जुलै महिन्यात पाऊस दमदार झाल्याने काही दिवस बसफेर्या रद्द झाल्या होत्या, त्याचा फटका या आगाराला बसला होता. साधारणपणे या आगरातून दिवसाला ३० हजार प्रवासी प्रवास करतात, त्या कालावधीत मात्र प्रवाशांचे प्रमाण ५० टक्क्यांहून कमी झाले होते, आता मात्र प्रवासी वाढले असून गणेशोत्सवाचा मोसम तेजीत गेला असल्याने परिवहन कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.