लाेकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण पूर्व भागातील रेल्वे स्टेशनवरील स्कायवॉकवरुन गरोदर महिला तिच्या नातेवाईकासह रुग्णालयात जात असताना तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. तिच्या प्रसूतीसाठी रिक्षा चालक धावले. यावेळी रिक्षा चालकांनी १०८ नंबरवर कॉल करुन रुग्णवाहिका मागवली असता त्यांच्याकडून रुग्णवाहिका निघाली असल्याचे सांगितले. मात्र, रुग्णवाहिका आलीच नाही. तिची प्रसूती स्कायवॉकवरच झाली. अखेरीच खासगी रुग्णवाहिकेच्या सहाय्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ती व तिचे नवजात बाळ सुखरुप असल्याची माहिती मदतीसाठी आलेल्या रिक्षा चालकांनी सांगितले.
कल्याण पूर्व भागात राहणारी गरोदर महिला सुरेखा शिंदे हिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्याने ती तिच्या नातेवाईकासोबत महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात निघाली होती. कल्याण पूर्वेतील रेल्वे स्टेशनच्या स्कायवॉकवर पोहचली असता तिला प्रसूतीच्या वेदना असहय्य हाेऊ लागल्या. वेदनांची तीव्रता वाढली. तिच्या मदतीला रिक्षा चालक धावले. त्यांनी रुग्णवाहिकेसाठी १०८ नंबरला केला. त्यावेळी तिथून असे सांगण्यात आले की, रुग्णवाहिका निघाली आहे. मात्र त्याठिकाणी रुग्णवाहिकाच पोहचली नाही. अखेर महिलेची अवघड अवस्था पाहून रिक्षा चालकांनी प्रसंगावधान राखत एका महिलेला पाचारण केले.
ते धावले तिच्या मदतीलारिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन गणेशोत्सव मंडपात उपस्थित असलेले उपाध्यक्ष विजय तावडे, कार्यकर्ते संजय जगताप यांनी प्रसंगावधान दाखवले. रुग्णवाहीकेने रुग्णालयात दाखल करण्यास बाबा शेख, चंदनशिवे, मनोज यादव, श्री जोशी, गणेश सुर्यवंशी, ‘प्रेम बंगाली या रिक्षा चालकांनी मदत केली.
n काही दिवसांपूर्वी गरोदर महिलेला प्रसूतीच्या वेदना स्कायवॉकवर सुरु झाल्यावर तिला हातगाडीवरुन महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात आणले असता. त्याठिकाणी तिला प्रसूतीकरीता दाखल करुन न घेतल्याने तिची प्रसूती रुग्णालयाच्या दारात झाली होती. त्यामुळे महापालिका रुग्णालयाची अनास्था उघड झाली होती. आता पुन्हा एका महिलेची प्रसूती स्कायवॉककवर झाली. तिच्यासाठी १०८ नंबरवर रुग्णवाहिकेसाठी कॉल करुन रुग्णवाहिका आली नाही. ही बाब या घटनेतून उघड झाली आहे.