लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : एकीकडे कल्याण-डोंबिवलीत घरफोडीच्या घटनांचे सत्र सुरू असताना दुसरीकडे डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. युसूफ रशिद शेख (वय २८) आणि नौशाद मुस्ताक आलम उर्फ सागर (२८) अशी दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून १८ गुन्ह्यांची उकल झाली आहे. धक्कादायक म्हणजे मुंबईतील डान्सबारमधील बारबालेवर युसूफचा जीव जडला. आतापर्यंत त्याने तिच्यावर ५० लाख रुपयांची उधळण केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. केवळ तिच्यावर पैसे उधळण्यासाठी युसूफ घरफोडीचे गुन्हे करीत होता आणि त्याला मित्र नौशादची साथ लाभत होती.
कल्याण-डोंबिवलीत घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. याच्या तपासकामी पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी कल्याण-डोंबिवलीत विशेष पथके नेमली आहेत. सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश मदने, सहायक पोलिस निरीक्षक सुनील तारमळे यांच्या पथकांचा घरफोडी गुन्ह्यांचा तपास सुरू होता. या पथकाने घणसाेली परिसरात राहणाऱ्या युसूफ आणि त्याचा मित्र नौशादला टिटवाळा, बनेली परिसरातून अटक केली.
मुद्देमाल जप्ततपासात ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई पोलिस आयुक्तालयातील १८ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सोने, चांदीचे दागिने, रोकड, लॅपटॉप, घड्याळ, मोबाइल, कॅमेऱ्यासह २० लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.