कल्याण- कल्याणच्या वालधूनी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीची मृत्यूनंतर कोविड टेस्ट पॉझिटीव्ह आली. कोरोनामुळे त्याच्या जगण्याची लढाई संपली होती. मात्र, त्याच्या दफनविधीसाठी त्याच्या कुटंबीयांना वणवण करावी लागली. अखेर शहाड येथील एका दफनभूमीने त्याच्या मृतदेहावर दफनविधी करण्यास तयारी दर्शविली. त्याच्या मृत्युचे दु:ख अनावर झालेल्या त्याच्या पत्नी व मुलाला या घटनेमुळे अश्रू अधिकच अनावर झाले होते.
वालधूनी परिसरात राहणाऱ्या या व्यक्तिला किडनीचा आजार होता. त्याला रात्री खूप त्रास सुरु झाला, त्याच्या पत्नीने त्याला उपचारासाठी रुक्मीणीबाई रुग्णालयात नेले. त्यावेळी, रुग्णालयात दाखल करुन घेण्यापूर्वी त्या व्यक्तीची अॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली. अॅन्टीजेन टेस्टचा रिपोर्ट येण्याच्या दरम्यानच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याचा कोरोना टेस्टचा रिपोर्टही पॉझिटीव्ह आला. त्यामुळे, त्यांच्या पत्नीने त्यांचे शेजारी नासीर शेख यांना मदतीस बोलाविले. मृतदेह घेऊन रुग्णवाहिका चालक स्मशानभूमीत गेला. मात्र, मृत व्यक्ती ही मुस्लीम धर्मीय आहे, हे त्यांच्या नंतर लक्षात आले. त्यांच्यावर अग्नी संस्कर होऊ शकत नाहीत. त्यासाठी दफनभूमीत नेले पाहिजे. त्यामुळे, गोंधळलेल्या परिस्थितीत मृतदेह पुन्हा रुक्मीणीबाई रुग्णालयात आणला. दफनविधी न झाल्याने सकाळी त्याचे शेजारी नासीर शेख व अन्य लोक पोहोचले. मृतदेह घेऊन शेजारी तीन ते चार कब्रस्तान फिरले. त्यावेळी कब्रस्थानमध्ये काम करणाऱ्यांनी अन्य ठिकाणी नेण्यास सांगितले.
दरम्यान, मृतदेह दफनविधीसाठी घेऊन शेजारी फिरत होते. दफनविधीसाठी जागा मिळत नसल्याने मृतदेह पुन्हा रुक्मीणीबाई रुग्णालयात आणला. अखेरीस शहाड येथील कब्रस्तानने दफनविधी करण्यास तयारी दर्शविली. तेव्हा कुठे शेजारी आणि त्याच्या पत्नीसह मुलाने सुटकेचा श्वास सोडला. मात्र, त्यांची स्थिती अत्यंत केविलवाणी झाली होती. मरणानंतर ही त्याच्या कुटुंबीयांना या यातना सहन कराव्या लागल्या. सामान्य माणसाला जीवन जगत असताना अनेक ठिकाणी कठीण परिस्थितीचा सामना करीत वणवण करावी लागत आहे. मृत्यूनंतरही त्याची वणवण संपत नाही, हे भयानक चित्र या निमित्ताने समोर आले आहे.