डोंबिवली - कल्याण आरटीओ आणि वाहतूक शाखा डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी संध्याकाळी वाहतूकीचे नियम मोडणा-या ४१ रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
रिक्षावाले त्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे नेहमीच चर्चेत असतात. यात रिक्षाचालक आणि प्रवाशाचे वाद घडतात. मुजोर रिक्षाचालकांवर कारवाई व्हावी अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने होत असताना सोमवारी संध्याकाळी वाहतूकीचे नियम मोडणा-या अशा रिक्षाचालकांविरोधात आरटीओ आणि वाहतूक शाखेने संयुक्त कारवाईची मोहीम उघडली होती. विना गणवेश, परवाना नसणे, स्टँड सोडून प्रवासी घेणे, भाडे नाकारणे, ओव्हरसीट, वाहतुकीला अडथळा करणे अशा बेशिस्तीचे दर्शन आणि वाहतूक नियम धाब्यावर बसविणा-या ४१ रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
आरटीओने १२ रिक्षाचालकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून १ लाख २० हजार रुपये दंड वसूल केला तर वाहतूक शाखा डोंबिवली च्या वतीने २९ रिक्षाचालकांवर कारवाई केली. ई चलन केसेस आणि २२ हजार ५५० रुपयांचा दंड त्यांच्यावर ठोठावण्यात आला. डोंबिवली पुर्वैकडील रेल्वे स्थानक परिसर, इंदिरा चौक, बाजीप्रभू चौक येथे ही कारवाई करण्यात आली. यापुढेही अशी कारवाई सुरुच राहणार असल्याचा दावा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक उमेश गित्ते यांनी केला आहे.