येत्या ३ दिवसात मविआतील मतभेद संपतील; भिवंडीचे उमेदवार सुरेश म्हात्रेंचा दावा
By मुरलीधर भवार | Published: April 6, 2024 08:44 PM2024-04-06T20:44:59+5:302024-04-06T20:46:00+5:30
Lok sabha Election 2024: भिवंडी लोकसभा मतदार संघात कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघ येतो. या मतदार संघातील शिवसेना आणि राष्ट्रवादीने सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहिर होताच छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष केला होता
कल्याण- भिवंडी लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे सुरेश बाळूमामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या मतदारसंघात काँग्रेसने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत सुरेश म्हात्रे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत नाराजी नाही. या मतदारसंघावर तीनही पक्षांचा दावा होता. सर्व पक्षातील कार्यकर्ते तिकिटासाठी मागणी करत होते. आता त्याच्यावर तोडगा निघाला आहे. कोणीतरी नाराज असतात. महाविकास आघाडी आमचे कुटुंब आहे. या कुटुंबातला हा विषय आहे. येत्या तीन दिवसात विषय सुटेल. कितीही मतभेद असले तरी येत्या दोन-तीन दिवसात हे मतभेद संपुष्टात येतील असे सुरेश म्हात्रे यांनी सांगितले.
भिवंडी लोकसभा मतदार संघात कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघ येतो. या मतदार संघातील शिवसेना आणि राष्ट्रवादीने सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहिर होताच छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष केला होता. त्यावेळी उमेदवार म्हात्रे उपस्थित नव्हते. आज स्वत: म्हात्रे हे कल्याणला आले होते. त्यांनी कल्याणमधील उद्धवसेनेच्या शहर शाखेला भेट दिली. या वेळी उद्धव सेनेच्या सैनिकांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी त्यांनी उपरोक्त खुलासा केला.