डोंबिवली : डोंबिवलीतून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर रील बनवल्यानंतर एका २५ वर्षीय तरुणाने डोंबिवली पश्चिमेकडील रेती बंदर रोडवरील मोठागाव माणखोली पुलावरून खाडीत उडी मारल्याची घटना शुक्रवारी (दि.२३) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत माहिती मिळताच विष्णूनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, तर अग्निशामक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी जाऊन शोधकार्य सुरू केले. मात्र, या तरुणाबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहित अशोक मोर्या असे खाडीत उडी मारणाऱ्या तरुणाचे नाव असून तो भिंवडी येथील साईनगर येथील गायत्री मंदिरासमोर कामत घर येथे राहत होता. रोहित दुपारी मित्रासोबत मोठा गाव माणखोली पुलावर रील काढण्यासाठी आला होता. मित्रासोबत रील बनवल्यानंतर त्याने पुलावरून खाडीत उडी टाकल्याचे मित्राने पोलिसांनी सांगितले. त्याने खाडीत उडी का टाकली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. काल दुपारपासून रोहितचा शोध सुरू करण्यात आला आहे. मात्र, याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही.
याचबरोबर, या प्रकरणी पोलिसांनी रोहितच्या मित्रांकडे चौकशी सुरू केली असून आत्महत्या आणि अपघात या दोन्ही बाजूंनी तपास सुरु आहे. दरम्यान, रोहितचा कोणासोबतही वाद नव्हता किंवा तो कोणत्याही तणावाखाली नव्हता, असे त्याच्या मित्रांनी सांगितले. मात्र तरी त्याने हे कृत्य का केले याबाबत मित्रांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. दुसरीकडे, डोंबिवली ते ठाणे अवघ्या 20 मिनिटात पोहोचवणाऱ्या या पुलाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा असतानाच अशी घटना घडल्याने परिसरातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली.