प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: एकीकडे वाहन चोरीचे सत्र सुरू असताना दुचाकी चोरणा-या दोघा सराईत चोरटयांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी २४ तासात जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून चोरी केलेली दुचाकी जप्त केली गेली आहे.
सुशांत पालकर यांची दुचाकी डोंबिवली पुर्वेकडील घरडा कंपनीच्या पार्कींगमधून चोरीला गेल्याची घटना बुधवारी घडली होती. याप्रकरणी पालकर यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला होता. या गुन्हयाचा समांतर तपास कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाकडून देखील चालू होता. या विभागाचे पोलिस नाईक सचिन वानखेडे यांना गुरूवारी खब-यामार्फत मिळालेल्या माहितीवरून त्यांच्यासह वरीष्ठ पोलिस निरिक्षक नरेश पवार, राहुल मस्के, सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष उगलमुगले, संदीप चव्हाण पोलिस हवालदार अनुप कामत, दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे , विलास कडू, अमोल बोरकर, पोलिस शिपाई विजेंद्र नवसारे, विनोद चन्ने आदिंच्या पथकाने सापळा लावून सागर्ली परिसरातून कैलास सुभाष जोशी ( वय ३८) आणि विक्रम उदय चव्हाण (वय ४८) दोघेही रा. त्रिमुर्तीनगर शेलारनाका डोंबिवली पूर्व, या दोघांना अटक केली. यातील आरोपी कैलास विरोधात कल्याण तालुका पोलिस ठाण्यासह मानपाडा पोलिस ठाण्यात एकूण सहा गुन्हे दाखल आहेत.