लोकमत न्यूज नेटवर्क : डोंबिवली
भाजपाचे सोशल मीडियाचे प्रभारी मनोज कटके यांच्यावर 28 फेब्रुवारी रोजी हल्ला झाला होता. मात्र या हल्लेखोरांना अद्याप अटक करण्यात आली नसल्याने भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. एकीकडे डोंबिवलीमध्ये रामनगर पोलीस ठाण्याबाहेर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. तर दुसरीकडे विधानभवन परिसरातही भाजपाने हल्लेखोरांना अटक करावी या मागणीसाठी आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं.
मनोज कटके हे आपल्या दुकानात बसलेले असताना दोन अज्ञात हल्लेखोर या ठिकाणी आले. आधी कटके यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकण्यात आली त्यानंतर बांबूने त्यांना मारहाण करण्यात आली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली..याप्रकरणी रामनगर पोलीस अधिक तपास करत आहे. नुकतेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीत येत कटके यांची भेट घेतली होती. यावेळी फडणवीस यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. इतकंच नाही तर पोलिसांच्या तपासावरही संशय व्यक्त केला होता. आज विधानभवनाबाहेर भाजपाचे नेते आशिष शेलार, डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण व इतरांनी आंदोलन करत या घटनेतील हल्लेखोरांना कधी अटक केली जाणार आहे? असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे आता येणाऱ्या काळात पोलीस या प्रकरणाचा तपास कसा करतात आणि आरोपींचा शोध कसा लावतात? ते पाहावं लागेल.