डोंबिवली - वाढीव वीजबिलासंदर्भात एक रुपया कमी करणार नाही असे जाहीर करून राज्य शासनाबद्दलचा जनतेच्या मनातील विश्वास उडाला आहे. असे हे तीन तिघाडी काम बिघाडी आघाडी सरकार असून त्याचा भाजपा कल्याण जिल्ह्यातर्फे जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे वक्तव्य पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केले. सोमवारी भाजपातर्फे कल्याणमध्ये आमदार गणपत गायकवाड, संजय मोरे यांच्या माध्यमातून महावितरणच्या तेजश्री, डोंबिवलीत मंडल ग्रामीण अध्यक्ष नंदू परब यांच्या मार्गदर्शनाखाली वीजबिल वाढीविरोधात एमयडीसीच्या महावितरण कार्यालयाबाहेर जनआंदोलन करण्यात आले.
कांबळे यांनी वीज बिलांचा शॉक या सरकारने नागरिकांना दिला, कोरोना काळात आरोग्याची हेळसांड सुरू असताना आणखी आर्थिक भुर्दंड देऊन समान्यांचे हाल सुरू केलेल्या या आघाडी सरकारने निर्णय बदलणे गरजेचे आहे असं म्हटलं आहे. वीज, पाणी, रस्ते, दळणवळण सुविधा या सगळ्याच मूलभूत प्रश्नांचे, गरजांचे तीनतेरा या सरकारने वाजवले आहेत, सांगा कसं जगायच समान्यांनी असा सवाल नंदू परब यांनी केला.
भाजपाचे हे केवळ एक आंदोलन नसून याआधीही जनआक्रोश आंदोलन, वाढीव बिलांची होळी आदींच्या माध्यमाने नाराजी, घोषणाबाजी करण्यात आली पण तरीही सरकारला जाग आलेली नाही असे हे निष्क्रिय सरकार असल्याने जनतेच्या काही कामाचे नाही अशी प्रतिक्रिया आमदार गायकवाड यांनी व्यक्त केली. वीजबिल कमी व्हायलाच हवे, शासनाकडे दाद मागायची नाही तर कोणाकडे मागायची असा सवाल मोरे यांनी केला.
दरम्यान, कल्याणमध्ये आमदार गायकवाड, मोरे यांच्यासह भाजपा कार्यकर्त्याना पोलिसांनी सोशल डिस्टंन्सिंगचं पालन होत नसल्याने विरोध केला, त्यावर भले गुन्हे दाखल करा पण रविवारी पत्रिपूल गर्डर टाकताना सोशल डिस्टंन्सिंग पाळलं गेलं का? असा नामोल्लेख न करता सवाल करत तिथले गुन्हे दाखल करणार का? असा सवाल केला. त्यानंतर पुन्हा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
डोंबिवलीत भाजपा पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करताना महावितरणचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड, भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, मंडळ अध्यक्ष नंदू जोशी, नंदू परब, महिला आघाडीच्या मनीषा राणे, युवा विद्यार्थी मोर्चा जिल्हाध्यक्ष मिहीर देसाई आदी. आठ दिवसात वरिष्ठ पातळीवर चर्चा करुन तोडगा काढणार असे बिक्कड म्हणाले आहेत.
कल्याणमध्ये भाजपाच्या आंदोलन कर्त्याना पोलिसांनी महावितरण कार्यालयाबाहेर रोखल्यानंतर निषेध करता येत नाही, असे हे दादागिरी, दंडुकेशाही करणारे सरकार असून त्या सरकारकडून काय अपेक्षा करायच्या, अन्य राज्यांनी 50 टक्के बिल कमी केली, जनतेला दिलासा दिला पण इथं मात्र तस होत नाही हे राज्य सरकारचे अपयश असून शिवसेना बाळासाहेब प्रमुखांचे शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा हे जरी स्वप्न पूर्ण झाले असले तरी जनतेचे प्रश्न सुटत नसतील तर ते योग्य नसल्याची संतप्त प्रतिक्रिया आमदार गायकवाड यांनी व्यक्त केली.