डोंबिवली: केडीएमसीच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासकामांच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपात जुंपली असताना मनसेने दोन्ही पक्षांवर हल्लाबोल केला आहे. गत निवडणुकीत घशात हात घालून दात काढले आता एकमेकांचे कपडे फाडतायत. दोघांनी कल्याण डोंबिवली शहरांसाठी काहीही केलेले नाही. त्यामुळे आपापसात भांडून स्वत:कडे लक्ष वेधून घेत आहेत. परंतु, जनता सुज्ञ आहे, यावेळेस ते मतदान करताना नककीच विचार करतील अशा शब्दात मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी सेना भाजपावर टिका केली.
आज मराठी भाषा दिनानिमित्ताने डोंबिवलीत मनसेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आमदार पाटील यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेना भाजपच्या गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कलगीतुऱ्यावर भाष्य केले. प्रत्येक निवडणुकीवेळी हे दोन्ही असेच सतत भांडतात याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित ठाकरे यांची नियुक्ती झाल्याबद्दल पाटील यांनी राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे अभिनंदनही केले. गेल्या दोन वर्षापासून आम्ही मागणी करत होतो, मराठी भाषा दिनाच्या चांगल्या मुहूर्तावर हा निर्णय घेतल्याचे पाटील म्हणाले. मराठी राजभाषा दिन सध्या सर्वच राजकीय पक्ष साजरा करीत आहेत. परंतु, अनेक वर्षापासून मनसेच्यावतीने हा दिन साजरा करीत आहे. मनसेच्या प्रत्येक शाखेत हा कार्यक्रम साजरा झाला पाहिजे, असे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश आहेत. त्यादृष्टीने आम्ही नियोजन करत असतो. आता इतर राजकीय पक्ष देखील हा दिन साजरा करीत आहेत, याचा आम्हाला आनंद आहे. मराठी वाढली पाहिजे असे पाटील म्हणाले.