अनिकेत घमंडी / पंकज पाटील
डोंबिवली/बदलापूर : कोकण शिक्षक मतदारसंघात काहीही करून विजय मिळवायचा हे बेरजेचे गणित साधण्यासाठी भाजपने आपल्या सर्व इच्छुक उमेदवारांना बाजूला सारत शिवसेनेच्या शिंदे गटातून उमेदवार आयात केला. पक्षाच्या या निर्णयामुळे भाजपकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली.
शेकापने विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचा पाठिंबा मिळेल. गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले ज्ञानेश्वर म्हात्रे यांना भाजपने उमेदवारी दिल्याने भाजप-शेकाप यांच्यात निवडणूक अटीतटीची होणार आहे.
कोकण शिक्षक मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपला बंडखोरीचा फटका बसला होता. त्यामुळे भाजपने यंदा आपला पारंपरिक मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. या निवडणुकीत चांगल्या उमेदवारासोबतच आर्थिक गणित भक्कम असणे गरजेचे असल्याने बाळासाहेबांची शिवसेनेच्या गटातील उमेदवारालाच आपल्याकडे ओढून भाजपने उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात घातली. बदलापूरचे शिक्षक म्हात्रे यांनी गेल्या निवडणुकीत आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांना घाम फोडला होता. शिक्षकांच्या संपर्कात राहिल्याने म्हात्रे यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव भाजपपुढे ठेवला. आता भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा अधिकृत उमेदवार म्हणून म्हात्रे यांच्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
गेल्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही शिक्षकांच्या समस्यांसाठी झटत राहिलो. माझ्या या कामाची दखल पक्षाने घेतली. पक्षाचा हा विश्वास सार्थकी लावण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. -ज्ञानेश्वर म्हात्रे, उमेदवार