डोंबिवली: कल्याण आरटीओच्या मनमानी कारभाराचा फटका सामान्य रिक्षा चालक, वाहनचालकांना बसला असून आरटीओ कार्यालयात कोणतेही काम वेळेवर होत नाही, त्या दिरंगाई विरोधात भाजप प्रणित रिक्षा चालक मालक संघटनेसह संलग्न संघटनांनी ८ जुलै, सोमवारी कल्याण शीळ रस्ता रोको करून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपचे कल्याण जिल्हा वाहतूक सेल अध्यक्ष दत्ता माळेकर यांनी याबाबत सोमवारी आरटीओ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन।करणार असल्याचे जाहीर केले. कल्याण आरटीओच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात एक दिवसीय लक्षणीक उपोषण व रास्ता रोको करणार असल्याचे ते म्हणाले. कल्याण आरटीओचे अधिकारी यांच्यासोबत भ्रमणध्वनीद्वारे बऱ्याच वेळा चर्चा केली, रिक्षा चालकांच्या अडचणी समस्या त्यांच्यासमोर वारंवार मांडल्या तरीही रिक्षा चालकांची कामे होत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. नियमात शासनाची फी भरून सर्व कागदपत्रे सादर केली असता, अधिकारी वर्गाकडून टाळाटाळ करण्यात येते.
आधी तीन महिन्यापूर्वी एक अधिकारी असताना रिक्षा चालकांची कामे होत होती,आता एक आरटीओ दोन एआरटीओ असे तीन अधिकारी असतानाही सामान्य वाहनचालक, रिक्षा चालकांची कामे करण्यास अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे मालेकर म्हणाले. अधिकाऱ्यांना हवे असणारे मलाईदार खाते, त्याची वाटाघाटी विषयांमध्ये सर्वसामान्य नागरिक व रिक्षाचालक भरडला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सर्व बाबी वारंवार अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देखील ते जाणून-बुजून या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्या मनमानी कारभाराचा निषेध म्हणून कल्याण आरटीओच्या विरोधामध्ये ८ जुलैरोजी इंदिरा गांधी चौक, डोंबिवली पूर्व येथे एक दिवशीय लक्षणीय उपोषण व कल्याण शीळ रस्ता भागाजी वझे चौक येथे रस्ता रोको करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
आरटीओ भ्रष्टाचार विरोधात सहा महिन्यात दुसरे आंदोलन : या अगोदरही ३० जानेवारी शहरातील सर्वपक्षीय रिक्षा संघटनांनी एकत्र येऊन कल्याण आरटीओच्या विरोधामध्ये, अधिकारी कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या भ्रष्टाचार विरोधात आंदोलन करण्यात आले।होते. आरटीओ कार्यालयात नागरिक व रिक्षा चालकांच्या पिळवणुकीबाबत एक दिवशीय लक्षणीय धरणे आंदोलन करण्यात आले होते. नागरिकांची व रिक्षा चालकांची कशी लूट कल्याण आरटीओकडून करण्यात येते याचा दर फलक ही लावण्यात आला होता, त्यावेळी अधिकारी बदलणार असून निश्चित फरक पडेल असे आश्वासन देण्यात आले होते, त्यानुसार आरटीओ अधिकारी बदलले परंतु भ्रष्टाचार मात्र कमी।झालेला नाही असे सांगून त्यांनी नाराजी व्यक्त।केली.