कल्याण - कल्याण मतदार संघातील लसीकरण केंद्रावर नागरीकांना लस देताना भेदभाव केला जात आहे. लसीकरणासाठी आलेल्या नागरीकांना भर उन्हात ताटकळत ठेवले जाते. हा प्रकार कळताच कल्याण पूर्व भागाचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी लसीकरण केंद्रावर धाव घेऊन त्याठिकाणी कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. त्यांचा व्हीडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
कल्याण पूर्व मतदार संघातील कॅम्प नंबर चार येथील परिसरातील एका शाळेवरील लसीकरण केंद्रासाठी नागरीकांनी रांग लावली होती. एकीकडे 45 वर्षे वय आणि त्यापेक्षा जास्त वय असलेले नागरिक रांगेत उभे होते. तर दुसरीकडे 18 ते 45 वयोगटातील नागरिक लसीकरणाच्या रांगेत उभे होते. या केंद्रावर नियोजन नसल्याने लोक उन्हात तिष्ठत उभे असल्याची माहिती आमदार गायकवाड यांना एका नागरिकाने कळविली. त्यानंतर, गायकवाड त्याठिकाणी पोहचले. त्यावेळ, केवळ कर्मचारीच तेथे होते. डॉक्टर व नर्स स्टाफ अद्यापही पोहचला नव्हता. त्यामुळे संतत झालेल्या गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांना अपशब्द वापरले. त्यामुळे कर्मचारी वर्गाकडून गायकवाड यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, याप्रकरणी गायकवाड यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, लसीकरण करताना भेदभाव केला जातो. एका बाजूला ऑनलाईन तर दुसऱ्या बाजूला ऑफलाईन नागरिकांची रांग लसीकरणासाठी होती. त्याठिकाणी ऑनलाईन रसिस्ट्रेशन करणाऱ्ंयाना लस दिली जाईल असे सांगितले गेले. मग ऑफलाईन नागरिकांना का रांगेत उभे करुन ठेवले होते असा सवाल डॉक्टर कर्मचाऱ्यांना विचारला. मात्र, त्यामागे त्यांचा अवमान करण्याचा उद्देश नव्हता. जे काही बोललो ते नागरिकांना लस मिळणे सुकर व्हावे, यासाठीच बोललो आहे. त्याचा विपर्यास करीत काही विरोधकांनी माझा हा व्हिडिओ व्हायरल केला आहे.