कल्याण- शिंदे गटापुढे भाजपचे काही चालत नाही असे विधान मनसे आमदार राजू पाटील यांनी नुकतेच केले होते. त्यांच्या या टिकेपश्चात कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी आमदार पाटील यांनी केलेल्या टिकेला दुजाेरा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून भाजप कार्यकर्त्यांचे खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप भाजप आमदार गायकवाड यांनी केला आहे. त्यांच्या आरोपानंतर शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजपमध्ये पुन्हा ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काही दिवसापूर्वी भाजपचे पदाधिकाऱ्याच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मुद्यावरुन भाजप आक्रमक झाली होती. त्यानी मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षकांची बदली करण्याची मागणी केली होती. मात्र पोलिस अधिकाऱ्याला शिवसेनेच्या शिंदे गटाकडून पाठीशी घातले जात असल्याचा आरोप भाजपने केला होता.
या वादानंतर भाजपने खासदार शिंदे यांना लोकसभा निवडणूकीत सहकार्य न करण्याचा ठराव भाजपच्या बैठकीत मंजूर केला. या सगळ्या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडदा टाकला होता. त्यानंतर हा वाद मिटला. मात्र त्यानंतर पुन्हा विकास कामांच्या मुद्यावरुन सोशल मिडियावर आमदार गायकवाड यांना शिदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी लक्ष्य केले होते. त्यांचा सोशल मिडियावरील वाद इतका विकोपाला गेला की, दोघांनी खुल्या चर्चेसाठी तयारी दाखविली. मात्र दोघेही एकमेकांसमोर येणार होते. त्याच वेळी पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी चर्चेच्या ठिकाणी येत असलेल्या शहर प्रमुख गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शिंदे गटाने पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. हा वाद शांत नाही. तोच आमदार गायकवाड यांनी शिंदे गटाकडून भाजपचे खच्चीकरण सुरु असल्याचा आरोप केल्याने शिंदे गट आणि भाजपमध्ये पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.