कल्याण - गोळीबार प्रकरणातील आरोपी भाजप आमदारगणपत गायकवाड यांच्या तिसाई केबल नेटवर्कचा ऑफिसची तोडफोड करण्यात आली आहे. कोळशेवाडी पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू केला आहे. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
कल्याण पूर्व येथील भाजप आमदारगणपत गायकवाड आणि त्यांचे पाच सहकारी गोळीबार प्रकरणात तळोजा जेलमध्ये आहेत. या प्रकरणात जखमी गोळीबार शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचा साथीदार राहुल पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलीस या प्रकरणाच्या तपास करीत आहे. मात्र दुसरीकडे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण पूर्व तिसगाव नाका परिसरात गणपत गायकवाड यांच्या तिसाई केबल नेटवर्कचे कार्यालय आहे. हे कार्यालय त्यांचे भाऊ अभिमन्यू गायकवाड हे चालवतात. सोमवारी संध्याकाळी केबल कार्यालयाच्या समोर एक बाईक उभी करण्यात आली होती. त्या बाईक सोबत एक तरुण काहीतरी करत होता. कार्यालयातील एका व्यक्तीने हे पाहिले. त्यांनी त्या तरुणाला हटकले ,त्यानंतर कार्यालयातील व्यक्ती आणि त्या तरुणांसोबत वाद सुरू झाला. या तरुणांनी आपल्या पाच ते सहा सहकाऱ्यांना फोन करून बोलून घेतले. सहा तरुण आमदारांच्या केबल कार्यालयाच्या समोर आले. सर्वांनी मिळून गणपत गायकवाड यांच्या केबल कार्यालयाची तोडफोड केली.
या प्रकरणात कोळशेवाडी पोलिसांनी सहा आरोपींनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तोडफोड करणारे तरुण कोण आहेत ? या प्रकरणाच्या तपास आता कोळशेवाडी पोलिसांनी सुरू केला आहे. सीसीटीव्हीच्या साह्याने पोलिसांच्या तपास सुरू आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. गणपत गायकवाड यांचा हा कार्यालय त्यांच्या निवासस्थान आणि त्यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून जवळच आहे.