कल्याण-कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत असलेल्या आशेळेपाडा येथील रस्ता आणि नाल्याचे काम सुरु आहे. त्याठिकाणी भाजप आमदार गणपत गायकवाड पोहचले. काम निकृष्ट दर्जा केले जात असल्याचे पाहून आमदार अधिकाऱ्यांवर संतापले. यावेळी कामाची जबाबदारी एकमेकांवर ढकलणाऱ्या अधिकाऱ्यांना आमदारांनी खडे बोल सुनावले.
आशेळेपाड्यात रस्ते आणि नाल्याचे काम सुरु आहे. या कामावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे या परिसरातील नागरीकांच्या घरात पाणी शिरले होते. या कामाची पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष घटनास्थळी आमदार गायकवाड पोहचले. सुरु असलेले काम अर्धवट आणि निकृष्ट दर्जा असल्याचे पाहून आमदारांनी संताप व्यक्त केला. एमएमआरडीएचे अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी नीट उत्तरे देत नसल्यानं आमदारांचा संताप अनावर झाला. नागरिक माङयाकडे येऊन तक्रारी करतात. त्यांची दखल मी घेतो. तुम्हाला त्यांचे म्हणणे ऐकून घेता येत नाही का? असा सवाल उपस्थित केला.
माझे शिक्षण कमी झाले असले तरी मी तुम्हाला भरपूर गणिते शिकवू शकतो अशा शब्दात आमदारांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. कामात पैसे खायचे, थुकपट्टीचे काम करायचे. त्यानंतर आमदारावर भ्रष्टाचाराचे आरोप होतो. हा मुद्दा देखील आमदारांनी मांडला. कामाचा दोष एमएमआरडीएचे अधिकारी व महापालिकेचे अधिकारी एकमेकांवर ढकलत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.
कामाच्या ठिकाणी विंड्थ काढून देणे आणि यूटीलीटी शिफ्ट करणे ही जबाबदारी केडीएमसीची आहे. केडीएमसी ते काढून देत नाही. अरविंद धाबे, एमएमआरडीए अधिकारी.
कामाच्या ठिकाणी ज्या काही अडचणी आहे. त्या आम्ही काढून देतो. दोन दिवसात अडचणी दूर करणार. त्यामुळे या कामाला कोणताही अडथळा येणार नाही.राजीव पाठक, कार्यकारी अभियंता, केडीएमसी.