कल्याण : कल्याण पूर्व मतदार संघातील आशळे माणोरे रस्त्यावर खड्डे पडून रस्त्यांची चाळण झालेली आहे. या रस्त्यावरील खड्ड्यातच बसून भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी होमहवन आंदोलन केले. आज मुख्यमंत्र्यांचा वाढदिवसाचे औचित्य साधत भाजपा आमदाराने केलेले हे आंदोलन लक्षवेधी आणि चर्चेचा विषय ठरले आहे. यावेळी संतप्त महिलांनी खड्ड्य़ात साचलेल्या पाण्यात कागदी होड्या सोडून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
कल्याण पूर्व मतदार संघात आशेळे व माणोरे हा परिसर येतो. या भागातील रस्त्यांच्या सिमेंट कॉन्क्रीटीकरणाच्या कामासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मंजूरी दिली होती. एमएमआरडीएच्या माध्यमातून 18 रस्ते विकसित केले जाणार होते. या रस्ते विकासाच्या कामाला विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली. त्यामुळे कल्याण पूर्व भागातील रस्त्यांच्या विकासाला ब्रेक लागला. रस्ते विकासाचे काम रखडले आहे.
गेल्या आठवड्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे आधीच खराब असलेल्या आशेळे माणोरा गावातील रस्तावर खड्डे पडले असून रस्त्यांची चाळण झाली आहे. हे रस्ते अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहे. रस्त्यावरील खड्डय़ात बसून आज आमदार गायकवाड यांनी होमहवन आंदोलन केले. रस्ते विकासाचे काम मुख्यमंत्र्यांनी रोखले असले तरी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दिर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना गायकवाड यांनी यावेळी केली.
गायकवाड यांचे हे उपहासात्मक आंदोलन चर्चेचा विषय ठरले आहे. किमान आत्ता तरी महाविकास आघाडी सरकारला जाग यावी अशी मागणी गायकवाड यांनी यावेळी केली. महापालिकेत सत्ता शिवसेनेची होती. महापौर, खासदार आणि पालकमंत्री शिवसेनेचे असताना विकास कामे का झाली नाहीत, असा संतप्त सवाल गायकवाड यांनी यावेळी उपस्थित केला आहे.