कल्याण : डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी १३ वर्षांत काय विकासकामे केली? त्यांनी आकड्यांत बोलू नये, अशी टीका शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी चव्हाण यांच्याविरोधात केली आहे.
चव्हाण यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात टीका केली आहे. परंतु, चव्हाण यांनी मांडलेले मुद्दे जुनेच आहेत. डोंबिवलीतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून निधी मंजूर केला होता. त्याचे पुरावे त्यांनी सादर करावे. आमदारांनी आकड्यात बोलू नये. विकास झाला आहे की नाही. तो कागदावर झाला की प्रत्यक्षात झाला, हे सांगावे. पालकमंत्री व खासदारांनी केलेल्या विकासकामांमुळे आमदारांचे डोळे दिपले आहेत, असे कदम म्हणाले.
कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांसाठी ३६० कोटी, डोंबिवली औद्योगिक परिसरातील रस्त्यांसाठी ११० कोटी व अन्य कामांसाठी ३० कोटी, असा निधी मंजूर झाला आहे. त्याची कामेही सुरू झालेली आहेत. याच कामाचा केवळ हिशेब केला तर जवळपास ५०० कोटींची विकासकामे सुरू आहेत. या व्यतिरिक्त पूल, रिंग रोड आदी विकासकामे प्रगतिपथावर आहे, असे कदम पुढे म्हणाले. फडणवीस यांनी साडेसहा हजार कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. मात्र, पैसा काही आला नाही. कागदी घोडे नाचवण्यापेक्षा आमदारांनी विकास दाखवा, असे कदम यांनी म्हटले आहे.