डोंबिवली- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमीपूत्रांंसह आगरी समाजाने संघर्ष केला. मात्र हा छोटासा विषय होता. एखाद्याने मन मोठे दाखविला असता तर भूमीपूत्रंसह आगरी समाजाला दि. बा. पाटीलांचे नाव देण्यासाठी संघर्ष करण्याची गरज भासली नसती असा टोला सार्वजनिक बांधकाम अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
डोंबिवलीतील ह.भ. प. संत सावळाराम महाराज क्रिडा संकुलात आगरी यूथ फोरमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 18 व्या आगरी महोत्सवाचे उद्घाटन मंत्री चव्हाण यांच्या हस्ते आज सायंकाळी करण्यात आले. या प्रसंगी माजी खासदार रामशेठ ठाकूर, भाजप आमदार गणपत गायकवाड, भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, समाजाचे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील, आगरी यूथ फोरमचे प्रमुख गुलाब वङो, आचार्य प्रल्हाद शास्त्री, हभप जयेश पाटील, जर्नादन जिताडे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कणसा या स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
मंत्री चव्हाण यांनी सांगितले, मनाचा मोठेपणा दाखवित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला.
यावेळी आगरी यूथ फोरचच्या वतीने या प्रकरणी दिल्ली दरबारी पाठपुरावा करण्याची मागणी मंत्री चव्हाण यांच्याकडे केली गेली. कार्यक्रमापश्चात मंत्री चव्हाण यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास आग्रही आहेत. हा विषय या आधीच दिल्ली दरबारी मांडण्यात आला आहे. नक्कीच या विषयात दिल्ली दरबारी देखील यश मिळेल असा विश्वास मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"