लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : भाजपचे कार्यकर्ते मनोज कटके यांच्यावर सोमवारी प्राणघातक हल्ला झाला. डोळ्यात मिरची पूड टाकून रॉडने गंभीर मारहाण झाल्याच्या घटनेला २४ तासांचा कालावधी उलटूनही या गुन्ह्यातील मारेकऱ्यांना पकडण्यात रामनगर पोलिसांना यश आलेले नाही. हा हल्ला राजकीय असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या शक्यतेबरोबरच हल्ल्यामागे वैयक्तिक कारण आहे का? याचीही चाचपणी केली जात असल्याचे सांगण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत मौन बाळगले असून, तपास सुरू असल्याकडे लक्ष वेधले.
कटके यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला, हाता-पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. सोमवारी सकाळी १०च्या सुमारास ते दुकानात असताना त्यांच्यावर दोघांनी हल्ला केला. हा मारहाणीचा प्रकार त्यांच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले असता, मारेकरी एका कारमधून आले होते. त्यामुळे दोनपेक्षा आणखी काही जण या कटात सहभागी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हल्लेखोर कारमधून रामनगर, मानपाडा रस्ता, कल्याण शीळ मार्गावरील संदप-दिवामार्गे फरार झाल्याचे त्या-त्या परिसरातील सीसीटीव्हीतून स्पष्ट झाले आहे. विशेष बाब म्हणजे हल्लेखोरांनी वापरलेल्या कारच्या मागे-पुढे नंबरप्लेट नव्हती.
विडंबन पोस्ट ठरली कारण?
कटके यांच्यावर हल्ल्यामागचे कारण वैयक्तिक आहे की राजकीय अशी चर्चा शहरात सुरू असतानाच चार ते पाच दिवसांपूर्वी विरोधी पक्षातील एका प्रमुखाबाबत सोशल मीडियावर टाकलेली विडंबनात्मक पोस्ट या हल्ल्यामागचे कारण आहे का? अशी चर्चा आहे. कटके यांनी याआधीही अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या आहेत. कटके यांच्यावर हल्ला याच कारणावरून झाला असावा, अशी शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तविली जात आहे. परंतु, त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.