कल्याण: केडीएमसी निडणुकीच्या तोंडावर भाजपला शिवसेनेकडून दे धक्का सुरुच आहे. आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात भाजप माजी नगरसेवक विशाल पावशे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. विशाल पावशेसह आत्तापर्यत भाजपचे चार मोठे नगरसेवक शिवसेनेत गेले आहेत. याचे श्रेय खासदार श्रीकांत शिंदे यांना दिले जात आहे. आगामी काळात भाजपचे आणखीन नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर आहेत. मात्र हे सर्व होत असताना कल्याण डोंबिवलीतील भाजपचे मोठे नेते असून या नगरसेवकांना थांबविण्याचा प्रयत्न का केला जात नाही, हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक तोंडावर आहे. निवडणूकीची पहिली स्टेज म्हणजे प्रभाग रचना जाहिर करण्यात आली आहे. आत्ता निवडणूकीच्या दिशेने केडीएमसीची तयारी सुरु झालेली आहे. ही तयारी सुरु असताना राजकीय पक्षांची तयारी सुद्धा जोरात आहे. प्रारुप आराखडय़ावरुन भाजप आणि मनसेने शिवसेनेवर हल्ला बोल केला होता. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु होते. आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवसा निमित्त ठाण्यातील कार्यक्रमात विशाल पावशे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. विशाल पावशे यांची राजकीय सुरुवात राष्ट्रवादीतून झाली होती. ते राष्ट्रवादीचे नगरसेवक होते. २०१४ सालच्या विधानसभा निवडणूकीत भाजपने त्यांना कल्याण पूर्व विधानसभा निवडणूकीत उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांना २५ हजारा पेक्षा जास्त मते पडली होती. त्यांना मिळालेली मते ही थोडी थोडकी नव्हती.
२०१५ सालच्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत ते भाजपतर्फे नगरसेवक पदी निडून आले. मात्र २०१९ सालच्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी भाजपमधून बंडखोरी करीत शिवसेना बंडखोर उमेदवाराला मदत केली. आत्ता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. काही महिन्यापूर्वी पालकमंत्री आणि खासदारांच्या उपस्थित भाजपचे तीन मोठे नगरसेवक महेश पाटील, सुनिता पाटील, सायली विचारे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला होता. आणखीन काही नगरसेवक खासदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे संकेत वारंवार दिले जात आहेत. ते सुद्धा शिवसेनेच्या वाटेवर आहे. काही दिवसात भाजप आणखीन मोठा धक्का शिवसेनेकडून दिला जाणार आहे.