लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कोजागिरी पौर्णिमा आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण रविवारी एकाच दिवशी साजरे झाले. त्यानिमित्त शहरातील दूधनाका येथे दिवसभरात २७०० लिटर, तर उर्वरित शहरात ३०० लिटर, अशी एकूण तीन हजार लिटर दुधाची विक्री झाली. रविवारी सकाळी दूध नाक्यावर दुधाचा भाव प्रतिलिटर ७४ रुपये होता, तर दुपारी २ वाजता हा भाव १० रुपयांनी वाढून ८४ रुपयांपर्यंत गेला, अशी माहिती येथील दूधविक्रेते अरहम मौलवी यांनी दिली.
कल्याणचा ऐतिहासिक दूध नाका हा दूधविक्रीसाठी प्रसिद्ध आहे. तेथे पहाटे २ वाजल्यापासून सुरू होणारी दूधविक्री दुपारी २, तसेच सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू असते. पश्चिमेतील मुस्लिमबहुल वस्तीत जवळपास १०० गोठे आहेत. त्यातील ताजे म्हशीचे दूध काढून जवळच असलेल्या दूधनाक्यावर सुटे विकले जाते. येथे विक्री करण्यात येणाऱ्या दुधाचा प्रतिलिटरचा दर दररोज बदलत असतो.
कोजागिरीला दररोजच्या घाऊक, किरकोळ खरेदीदारांबरोबरच अनेक सोसायटीमधील रहिवासी येथे दुधाची खरेदी करण्यासाठी येतात रात्री सोसायटीच्या आवारात किंवा गच्चीवर कोजागिरी साजरी केली जाते. प्रत्येकाला चंद्रप्रकाशात गरम दूध दिले जाते. त्याचबरोबर ईद-ए-मिलादला मुस्लिमही दूध खरेदी करतात. यंदा हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने येथील दूध व्यावसायिकांसाठी दुग्धशर्करा योग होता. त्यामुळे दूधनाका परिसराबरोबर शहरातील अन्य परिसरांतील दूध विक्रेत्यांकडूनही रविवारी जास्त प्रमाणात दुधाची विक्री झाली. वेळेच्या आधीच दूध संपल्याने काहींना रिकाम्या हाताने परत जावे लागल्याचे दूधविक्रेते सरवर मौलवी यांनी सांगितले.