डोंबिवली:
सोशल मिडीयामध्ये तरुण पिढी भरकटली आहे. त्यामुळे समाजमनावर ग्लानी आली आहे. यासाठी वाचन संस्कृती बळकट करण्याची गरज आहे. वाचन संस्कृती वाढवण्यासाठी वाचनालयाची शृंखला वाढीस लागणे गरजेचे आहे. या सर्वात फ्रेण्डस लायब्ररीचा पुस्तक आदान प्रदान प्रकल्प हा मोठी देणगी आहे, असे प्रकल्प यशस्वी करण्यासाठी कायम महापालिका भक्कमपणे पाठिशी राहिल असे आश्वासन आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिले.
पहिल्या बहुभाषिक पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचा समारोप रविवारी झाला. त्यावेळी विद्याधर भुस्कुटे यांच्या किनारा तुला पामराला या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांची उपस्थिती होती. २० जानेवारीपासून दहा दिवस चालू असलेल्या पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचा समारोप अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आयुक्त दांगडे यांनी या सर्व उपक्रमाचे कौतुक केले. लायब्ररीच्या उपक्रमांना मदत करुन वाचन संस्कृतीचा अधिकाधिक प्रसार करण्यासाठी एकत्र काम करणार असेही त्यांनी जाहीर केले.
या सोहळ्याला विशेष उपस्थिती अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, दर्शना सामंत, रोहीणी लोकरे, डॉ. वृंदा भुस्कुटे, विद्याधर भुस्कुटे, एसीपी सुनील कुराडे आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत भुस्कुटे यांच्या किनारा तुला पामराला या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. भारतभ्रमण करणा-या भुस्कुटे यांचे हे चौथे पुस्तक आहे. ग्रंथाली प्रकाशनातर्फे या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. पुंडलीक पै यांनी प्रास्ताविक केले. दहा दिवस चाललेल्या या साहित्य सोहळ्यात एक लाखाच्यावर पुस्तकांचे आदान प्रदान झाल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच सत्तर हजार वाचकांनी या पुस्तक सोहळ्याला भेट दिली. चाळीस शाळांचे विद्यार्थी या पुस्तक आदान प्रदान सोहळ्यात आले आणि पुस्तकांच्या सहवासात रमल्याचे म्हंटले. भुस्कुटे यांनी ते डोंबिवलीकर असल्याचा अभिमान असल्याचे सांगून हे पुस्तक कोरोना महामारीत रुग्णसेवेत असलेल्या कोरोना रुग्णांना समर्पित करत असल्याचे सांगितले. एसीपी सुनील कु-हाडे यांनीही यावेळी मार्गदर्शन करतांना आदान प्रदान सोहळ्याचे कौतुक केले. याप्रसंगी सियाचिन आणि कुपवाडा येथे ऑक्सिजन प्लांट उभारलेल्या एसआयआरएफच्या सुमेधा चिथडे यांनीही उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी या संपूर्ण उपक्रमाची पहाणी केली आणि कौतुक केले. मोबाईलच्या माध्यमातून मुलं काय वाचतात याची काळजी पालकांनी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. मालिकांमधील नातेसंबंधाबाबत बोलतांना मृणाल कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त करत मुलांना आपल्या कुटुंबाची माहिती करुन द्यावी असे सांगितले. मुलांसोबत पालकांचे संबंध हे खेळीमेळीचे असावेत, पालकांनी मुलांना वाचायला प्रवृत्त करावे असे आवाहनही मृणाल कुलकर्णी यांनी केले. याशिवाय या ज्ञानयज्ञाला भेट देण्याची संधी मिळाली याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
या सोहळ्याचे सूत्रसंचालन मंजिरी फाटक यांनी केले. दिपाली काळे यांनी आभार मानले. दहा दिवस चालू असलेल्या या पुस्तक आदान प्रदान सोहळ्याच्या समारोप समारंभाला अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी लिना मॅथ्यू, मिना गोडखिंडी, धनश्री लेले, ललिता छेडा, प्रा. राम नेमाडे, सतिष भावसार आदी मान्यवर उपस्थित होते.