कल्याण- भाजपशी रिपाई आठवले गटाईचे युती आहे. मात्र ठाणे जिल्ह्यातील भाजपच्या कोणत्याही कार्यक्रमात रिपाईला विश्वासात घेतले जात नाही. त्यांच्या कार्यक्रमाच्या बॅनरवर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा फोटो देखील नसतो. भाजपकडून आम्हाला वारंवार दुजेभावाची वागणूक दिली जाते. त्यामुळे भाजपच्या कार्यक्रमावर आम्ही बहिष्कार टाकू असा इशारा रिपाई आठवले गटाचे राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे यांनी भाजपला दिला आहे.
कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात रिपाई आठवले गटाचा आज जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी मेळाव्यास संबोधित करताना राष्ट्रीय सचिव बहादूरे यानी हा इशारा दिला. कल्याण, मुरबाड, अंबरनाथ या ठिकाणची विधानसभेची जागा भाजपने रिपाईला दिलेली नाही. सत्तेसाठी आमची युती चालते. मात्र आम्हाला सत्तेतील वाटा दिला जात नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कल्याण डोंबिवलीत दोन दिवसीय दौऱ््यावर होते. त्यावेळीही भाजपने रिपाईला बोलाविले नाही. याकडे बहादुरे यानी लक्ष वेधले आहे.
कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप
रिपाईचे उपाध्यक्ष अण्णा रोकडे यांनी जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी पक्ष हायजॅक केला आहे. पक्षाचा मेळावा असलात बॅनरवर केवळ त्यांचा आणि त्यांच्या मुलाचाच फोटो झळकला आहे. रोकडे यांनी केलेल्या आरोपानंतर जिल्हाध्यक्ष जाधव यांनी त्यांना प्रतिउत्तर दिले की, तुम्ही काय करता. एखादा कार्यक्रम ठरविता. तो करण्यासाठी आमदार खासदारांकडून पैशाची वर्गणी गोळा करता या शब्दात सुनावले. यावरुन मेळाव्यातील वातावरण तापले आहे.
या संदर्भात राष्ट्रीय सचिव बहादुरे यांनी पक्षाचा मेळाव्यात आपल्या घरातील भांडण बोलून दाखवायचे नसतात. आपले आपसातील वाद हे बंद दाराच्या आड मिटविले गेले पाहिजेत असा सल्ला दिला. पक्षाच्या कार्यक्रमास कार्यकत्यांची उपस्थिती कमी आहे. त्याला केवळ जिल्हाध्यक्ष जबाबदार नाही. तर त्याची जबाबदारी प्रत्येक पदाधिकाऱ््याची आहे.